लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : मानवी जीवन वाचविण्यासाठी अवयवदानाचे महत्त्व अनन्यसाधारण असून लोकांमध्ये ते रुजत आहे. शुक्रवारी परतवाडा येथील ६५ वर्षीय मेंदू मृत (ब्रेन डेड) महिलेचे यकृत नागपुरातील एका खासगी हॉस्पिटलमध्ये उपलब्ध झाले. येथे ६१ वर्षीय दिल्लीच्या रुग्णावर यकृत प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती. नागपुरातील हे नववे यकृत प्रत्यारोपण आहे.कुसुम अजाबराव इंगळे (६५) रा. नरसरी ता. अचलपूर असे ‘ब्रेन डेड’ महिलेचे नाव. १४ आॅगस्ट रोजी त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना भंसाली यांच्या इस्पितळात दाखल केले. येथे डॉक्टरांच्या चमूने तपासणी करून कुसुम यांना ब्रेन डेड घोषित केले. डॉक्टरांनी इंगळे कुटुंबीयांना अवयव प्रत्यारोपणाची माहिती दिली. कुसुम यांचा मुलगा शंकर इंगळे व नातू डॉ. पंकज इंगळे यांनी त्या दु:खातही अवयवदानाचा निर्णय घेतला. याची माहिती झोनल ट्रान्सप्लान्ट कोआॅर्डिनेशन सेंटरच्या (झेडटीसीसी) अध्यक्ष डॉ. विभावरी दाणी, सचिव डॉ. रवी वानखेडे यांना देण्यात आली. त्यांच्या मार्गदर्शनात डॉ. सुधीर टॉमी व नागपूर झोनल कोआॅर्डिनेटर वीणा वाठोरे यांनी तातडीने पुढील प्रक्रिया पूर्ण केली. नागपूरच्या एका खासगी हॉस्पिटलमधील नोंदणीकृत रुग्णाला हे अवयवदान करण्याचा निर्णय ‘झेडटीसीसी’ने घेतला. त्यानंतर येथील एका डॉक्टरांचे पथक परतवाड्यात गेले. डॉ. प्रकाश जैन, डॉ. अजिताभ श्रीवास्तव, डॉ. आशिष भंसाली, डॉ. सुरेंद्र बरडिया, डॉ. रमेश कानुनगो, डॉ. शरद अडोनी यांनी यकृत काढून मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन केला. दुपारी ४ वाजता ‘ग्रीन कॉरिडॉर’च्या मदतीने परतवाडा, अमरावती ते नागपुरात अवयव दाखल झाले. तालुकास्तरावरील अवयवदानाची ही पहिलीच घटना आहे.दिल्लीहून नागपुरात आणले रुग्णाला‘झेडटीसीसी’च्या निर्णयानंतर संबंधित खासगी हॉस्पिटलमध्ये यकृत प्रत्यारोपणासाठी नोंद केलेल्या रुग्णाला याची माहिती देण्यात आली. त्यांना दिल्लीहून नागपुरात विमानाने आणण्यात आले. शुक्रवारी सायंकाळी ५ वाजतापासून प्रत्यारोपण शस्त्रक्रियेला सुरुवात झाली. रात्री उशिरापर्यंत ही शस्त्रक्रिया सुरू होती.
परतवाडा येथील यकृताचे नागपुरात प्रत्यारोपण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2018 8:57 PM
मानवी जीवन वाचविण्यासाठी अवयवदानाचे महत्त्व अनन्यसाधारण असून लोकांमध्ये ते रुजत आहे. शुक्रवारी परतवाडा येथील ६५ वर्षीय मेंदू मृत (ब्रेन डेड) महिलेचे यकृत नागपुरातील एका खासगी हॉस्पिटलमध्ये उपलब्ध झाले. येथे ६१ वर्षीय दिल्लीच्या रुग्णावर यकृत प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती. नागपुरातील हे नववे यकृत प्रत्यारोपण आहे.
ठळक मुद्दे इंगळे कुटुंबीयांचा पुढाकार : दिल्लीच्या रुग्णाला मिळणार जीवनदान