लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महापालिकेतील सत्तापक्षातील अंतर्गत वादात परिवहन सभापतींचा राजीनामा घेण्यात आला. समितीच्या नवीन सदस्यांची घोषणा करण्यात आली; परंतु अजूनही सभापतींची निवड झालेली नाही. सभापती नसल्याने परिवहन समितीचा अर्थसंकल्प रखडला होता. यामुळे स्थायी समितीचा २०२१-२२ या वर्षाचा अर्थसंकल्पही रखडला होता; परंतु शुक्रवारी परिवहन व्यवस्थापक रवींद्र भेलावे शुक्रवारी समिती सदस्यांच्या वतीने स्थायी समिती अध्यक्ष प्रकाश भोयर यांना अर्थसंकल्प सादर करतील. यामुळे मनपाचा पुढील वर्षाचा अर्थसंकल्प मांडण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
वर्षभरापासून कोरोना संकट आहे. पहिल्या लाटेच्या तुलनेत दुसरी लाट भीषण आहे. हजारो लोकांचे बळी जात आहेत. दुसरीकडे शहरातील विकासकामे ठप्प आहेत. प्रभागातील अत्यावश्यक कामेही रखडल्याने लोकांमध्ये प्रचंड रोष आहे. सलग दोन वर्षे विकासकामे रखडली असताना, परिवहन समितीने अर्थसंकल्प सादर न केल्याने स्थायी समितीचा अर्थसंकल्प रखडला होता.
सत्तापक्षातील अंतर्गत वादात इच्छा नसताना परिवहन समितीचे सभापती बाल्या बोरकर यांना कार्यकाळ संपण्यापूर्वीच पदाचा राजीनामा द्यावा लागला. बंटी कुकडे यांच्याकडे पुन्हा सभापती पदाची जबाबदारी दिली जाणार आहे. परंतु, सभापतीची निवडणूक प्रलंबित असल्याने सध्या परिवहन विभागाला सभापती नाही. यामुळे विभागाचा २०२१-२२ या वर्षाचा अर्थसंकल्प सादर झालेला नाही. परिवहनचा अर्थसंकल्प सादर झाल्याशिवाय स्थायी समितीला अर्थसंकल्प सादर करणे शक्य नसल्याने यावर पर्याय म्हणून व्यवस्थापक विभागाचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत.
जूनमध्ये स्थायी समितीचा अर्थसंकल्प
स्थायी समितीचे अध्यक्ष प्रकाश भोयर यांनी पदभार स्वीकारताच ३१ मार्चपूर्वी मनपाचा २०२१-२२ या वर्षाचा अर्थसंकल्प सादर करण्याचा संकल्प केला होता. अर्थसंकल्प लवकर सादर केला, तर रखडलेली विकासकामे पावसाळ्यापूर्वी सुरू करता येतील, लोकांचा रोष कमी होईल, असा त्यांचा मानस होता; परंतु परिवहन समितीचा अर्थसंकल्प सादर न झाल्याने स्थायी समितीचा अर्थसंकल्प रखडला. आता जूनच्या पहिल्या आठवड्यात स्थायी समितीचा अर्थसंकल्प सादर केला जाणार असल्याची माहिती भोयर यांनी दिली.