लाेकमत न्यूज नेटवर्क
देवलापार : पाेलिसांनी मानेगाव टेक-करवाही मार्गावर केलेल्या कारवाईमध्ये गुरांची अवैध वाहतूक करणारी झायलाे पकडली. यात आराेपी पळून गेल्याने कुणालाही अटक करण्यात आली नाही. मात्र, पाेलिसांनी पाच गुरांची सुटका करीत ३ लाख ५० हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई शुक्रवारी (दि. २३) दुपारी १ वाजताच्या सुमारास करण्यात आली.
देवलापार (ता. रामटेक) पाेलिसांचे पथक गस्तीवर असताना त्यांना मानेगाव टेकहून करवाहीच्या दिशेने गुरांची वाहतूक केली जात असल्याची महिती मिळाली हाेती. त्यामुळे पाेलिसांच्या पथकाने या मार्गाची पाहणी केली. पाेलिसांनी या मार्गावरील नाल्याजवळ नाकाबंदी केल्याचे लक्षात येताच एमएच-३१/सीएच-३४०८ क्रमांकाच्या झायलाे चालकाने आधीच वाहन थांबविले आणि ते साेडून पळ काढला. पाेलिसांनी त्या वाहनाची झडती घेतली असता, त्यांना वाहनात पाच जनावरे काेंबली असल्याचे आढळून आले.
ती गुरांची अवैध वाहतूक असल्याचे तसेच ती जनावरे कत्तलखान्यात नेली जात असल्याचे चाैकशीत स्पष्ट हाेताच पाेलिसांनी गुरांसह वाहन जप्त केले. त्या जनावरांना नजीकच्या गाेशाळेत पाठविण्याची व्यवस्था पाेलिसांनी केली. या कारवाईमध्ये तीन लाख रुपयाची झायलाे आणि ५० हजार रुपये किमतीची पाच जनावरे असा एकूण ३ लाख ५० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला, अशी माहिती ठाणेदार प्रवीण बाेरकुटे यांनी दिली. आराेपींना लवकरच अटक करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. याप्रकरणी देवलापार पाेलिसांनी गुन्हा नाेंदवून तपास सुरू केला आहे. ही कारवाई पाेलीस उपनिरीक्षक केशव पुंजरवाड, उपनिरीक्षक लक्ष्मी घाेडके, जाधव, रमेश खरखटे, राजेश साेनटक्के यांच्या पथकाने केली.