‘लोकमत’चे मानले आभार : कारवाईचे आदेशही दिलेनागपूर : वाहनांवर नंबर टाकताना तो एका विशिष्ट आकारात व चार अंकात टाकण्यात यावा, असा नियम आहे. मात्र अधिवेशन परिसरातच या नियमांची पायमल्ली होत असल्याचे वृत्त ‘लोकमत’ने मंगळवारच्या अंकात प्रसिद्ध केले. या वृत्तामुळे खळबळ उडाली. विशेष म्हणजे, स्वत: परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी याची गंभीर दखल घेतली. जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांना उपलब्ध करून दिलेल्या वाहनाची चुकीची नंबर प्लेट बदलवली, सोबतच प्रादेशिक परिवहन कार्यालयाला (आरटीओ) अशा फॅन्सी नंबर प्लेटच्या वाहनांवर कारवाईचे निर्देशही दिले. चारचाकी वाहनाच्या पुढील व मागील नंबर प्लेटवरील अक्षरे व अंकांची जाडी १० मिलिमीटर, उंची ६५ मिलिमीटर असावी. दोन अक्षरांमधील अंतर हे १० मिलिमीटर असावे, असा नियम आहे. मात्र सोमवारी अधिवेशनाच्या परिसरात उभ्या केलेल्या ‘१’ क्रमांकाच्या नंबर प्लेटवरील सर्वच वरिष्ठ अधिकाऱ्यांची वाहने या नियमांचे उल्लंघन करीत होते. विशेष म्हणजे, चार लाख शुल्क असलेला ‘१’ क्रमांक लोकांना दिसावा म्हणून अनेक वाहनचालकांनी नियम मोडत तो मोठा करून लिहिला होता. नंबर प्लेट ही चार अंकात असावी असाही नियम असताना केवळ ‘१’ क्रमांकच टाकला. आरटीओसह वाहतूक पोलीस विभागाचे याकडे दुर्लक्ष झाल्याचे वृत्त लोकमतने ‘अधिवेशन परिसरातच नियमांची पायमल्ली’ या मथळ्याखाली प्रसिद्ध केले. याची दखल स्वत: परिवहन मंत्र्यांनी घेतली. त्यांनी ‘लोकमत’च्या या वृत्ताचे आभार मानले. त्याचे स्वीय सहायक बढे यांनी ‘लोकमत’ला सांगितले, जिल्ह्याधिकाऱ्यांनी वाहन उपलब्ध करून दिल्याने चुकीच्या नंबरप्लेटकडे त्यांचे लक्षच गेले नाही. ‘लोकमत’च्या वृत्तामुळे चूक लक्षात आली. यामुळे सर्वप्रथम आपल्या वाहनाची नंबर प्लेट बदलविली. मोठ्या अक्षरात लिहीलेला ‘१’ क्रमांक नियमानुसार लिहून त्या आधी तीन शून्यही लावले. याची गंभीर दखल घेत परिवहन मंत्र्यांनी रस्त्यावर धावत असलेल्या फॅन्सी नंबर प्लेटच्या वाहनांवर कारवाईचे आदेशही दिले आहेत. सूत्राने दिलेल्या माहितीनुसार आरटीओ शहर कार्यालयाने रात्री उशिरापर्यंत अनेक दोषी वाहनांवर कारवाई केल्याचे समजते.(प्रतिनिधी)
परिवहन मंत्र्यांनी बदलली नंबर प्लेट
By admin | Published: December 09, 2015 3:40 AM