नागपूर : कत्तलीसाठी झायलो गाडीत ६ गोवंशाची जनावरे कोंबून नेत असलेल्या आरोपीला जुनी कामठी पोलिसांनी गजाआड केले आहे. ईसाक बबलु तंडी (१९, रा. कामगारनगर, यशोधरा बुद्ध विहाराजवळ, कामठी) असे अटक करण्यात आलेल्या आरोपी चालकाचे नाव आहे.
२८ मे रोजी पहाटे ४.२५ ते ५.१५ दरम्यान जुनी कामठी पोलिसांनी मिळालेल्या माहितीनुसार चौधरी मस्जिदजवळ कामठी येथे एका गोल्डन रंगाच्या झायलो कार क्रमांक एम. एच. २३, ई-५७७५ च्या चालकास थांबविले. पोलिसांनी कारची पाहणी केली असता त्यात ६ गोवंशाची जनावरे किंमत १ लाख २० हजार कोंबून नेण्यात येत असल्याचे दिसले. पोलिसांनी आरोपी चालकाला जनावरे वाहतुकीचा परवाना व कागदपत्र मागितले असता त्याने कोणतेही कागदपत्र सादर केले नाही.
आरोपी चालक हा पाहिजे असलेल्या आरोपी गाडी मालकाच्या संगणमताने आपल्या आर्थिक फायद्यासाठी जनावरांची वाहतूक करीत असल्याने पोलिसांनी त्याच्या ताब्यातून ६ गोवंशाची जनावरे व वाहन असा एकुण ५ लाख ७० हजारांचा मुद्देमाल जप्त केला. जप्त केलेल्या गोवंशांना गोशाळेत पाठविण्यात आले. आरोपीविरुद्ध कलम ५(ब), ९(अ), महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायदा १९७६, सहकलम ११(१)(ड) प्राणी क्रुरता अधिनियम-१९६०, सहकलम ८३/१७७ नुसार गुन्हा दाखल करून त्यास अटक करण्यात आली आहे.