लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ट्रान्सपोर्टर बॉबी ऊर्फ भूपेंद्रसिंग मंजितसिंग माकन (वय ४६, रा. दीक्षितनगर) यांचे अपहरण करून त्यांची निर्घृण हत्या करणाऱ्या आरोपींचा पोलिसांनी अद्याप छडा लावला नसल्याने सर्वत्र रोष निर्माण झाला आहे. दरम्यान, सोमवारी दुपारी माकन यांच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले. अंत्ययात्रेत शोकसंतप्त वातावरणासोबतच तणावही होता.जरीपटक्यातील वाहतूक व्यावसायिक बॉबी माकन यांचे त्यांच्या कार्यालयातून गुरुवारी मध्यरात्री पाच ते दहा आरोपींनी अपहरण केले. त्यांचे तीनही फोन बंद केले आणि त्यांची कार जरीपटक्यातील घराजवळ सोडून आरोपी त्यांना आपल्या वाहनातून घेऊन गेले. दुसºया दिवशी सकाळी त्यांच्या पत्नीने जरीपटका ठाण्यात तक्रार नोंदविली. यावेळीच त्यांनी अपहरण आणि घातपाताची शंकाही व्यक्त केली होती. मात्र, पोलिसांनी तातडीने तपास करण्याची तसदी घेतली नाही. ३६ तासानंतर जरीपटका आणि गुन्हे शाखेचे पोलीस सक्रिय झाले. पोलिसांकडून माकन यांची शोधाशोध सुरू असतानाच, रविवारी सकाळी कातलाबोडी शिवारात पुलाच्या खाली माकन यांचा मृतदेह कोंढाळी पोलिसांना आढळला. त्यांची आरोपींनी गळा आवळून हत्या केल्यानंतर पुलावरून मृतदेह खाली फेकल्याचा अंदाज पोलिसांनी काढला आहे. मारेकऱ्यांनी माकन यांच्या डोक्यावर, पोटावर आणि हातावर जबर मारहाण केल्याच्या खुणा असून, त्यांची ओळख पटू नये म्हणून मारेकºयांनी त्यांचा चेहरा अॅसिड टाकून विद्रूप केल्याचे पोलीस सांगतात. दरम्यान, जरीपटका पोलिसांनी अपहरण आणि हत्येचा गुन्हा दाखल करून, रविवारी दुपारी माकन यांचा मृतदेह मेडिकलमध्ये नेला होता. त्यानंतर जरीपटका, पाचपावली पोलीस आणि गुन्हे शाखेची पथके अचानक सक्रिय झाली. त्यांनी बॉबी माकन यांच्या विरोधक आणि मित्र तसेच संपर्कातील दोन डझनपेक्षा जास्त व्यक्तींशी संपर्क केला. काही संशयितांना ताब्यात घेत त्यांची चौकशीही केली. मात्र, सोमवारी रात्रीपर्यंत कुणालाही अटक झाली नव्हती. दरम्यान, सोमवारी दुपारी माकन यांचा मृतदेह ताब्यात घेऊन त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांच्यावर शोकसंतप्त वातावरणात अंत्यसंस्कार केले.पोलिसांचा हलगर्जीपणा उघडया प्रकरणात जरीपटका पोलिसांचा हलगर्जीपणा उघड झाला आहे. तक्रार मिळताच पोलिसांनी गंभीरपणे तपास सुरू केला असता तर कदाचित माकन जिवंतच हाती लागले असते. मात्र, तक्रार मिळाल्यानंतरही पोलीस तब्बल ३६ तास मख्ख बसले. त्याचमुळे शहरात अपहरण करून हत्या झाल्याचा गंभीर गुन्हा घडला. माकन यांचे अपहरण करून हत्या करणारे आरोपी सराईत गुन्हेगार असल्याचे पोलीस आता सांगू लागले आहेत. या हत्याकांडात मोठी सुपारी असल्याचीही उत्तर नागपुरात चर्चा आहे.चार वाहनांचा वापर?पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपींनी या गुन्ह्यात चार मोठ्या वाहनांचा वापर केला. त्यात एक विना क्रमांकाची इनोव्हा असल्याचे समजते. घटनेच्या एक दिवसापूर्वीपासूनच ही इनोव्हा माकन यांच्या कार्यालयाच्या आजूबाजूच्या परिसरात फिरत होती. पोलिसांना या गुन्ह्याचा छडा लावण्यासाठी महत्त्वाचे धागेदोरे ठरणारे काही सीसीटीव्ही फुटेज मिळाल्याचे समजते. त्या आधारे पोलिसांची एकूण सात पथके आरोपींचा शोध घेण्यासाठी कामी लागली आहेत. त्यातील काही पथके बाहेरगावीही गेली आहेत.
नागपुरातील ट्रान्सपोर्टर अपहरण-हत्याकांडाचे आरोपी मोकाट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2019 1:02 AM
ट्रान्सपोर्टर बॉबी ऊर्फ भूपेंद्रसिंग मंजितसिंग माकन (वय ४६, रा. दीक्षितनगर) यांचे अपहरण करून त्यांची निर्घृण हत्या करणाऱ्या आरोपींचा पोलिसांनी अद्याप छडा लावला नसल्याने सर्वत्र रोष निर्माण झाला आहे. दरम्यान, सोमवारी दुपारी माकन यांच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले. अंत्ययात्रेत शोकसंतप्त वातावरणासोबतच तणावही होता.
ठळक मुद्देमृत माकन यांच्यावर अंत्यसंस्कार : पोलिसांची धावपळ वाढली, आरोपींचा छडा नाही