नागपूर : चोरीच्या रेतीची वाहतूक करणाऱ्या ट्रक चालकास अटक करून हुडकेश्वर पोलिसांनी ४० लाख ४० हजारांचा मुद्देमाल जप्त केला. ही घटना रविवारी रात्री २.१५ ते २.४५ दरम्यान घडली.
निखील शंकरराव भोयर (वय ३५, रा. सुरजनगर, वाठोडा) असे अटक करण्यात आलेल्या ट्रक चालकाचे नाव आहे. हुडकेश्वर पोलिसांचे पथक रविवारी रात्री राजापेठ बसस्टॉप चौक येथे नाकाबंदी करीत असताना त्यांनी संशयावरून एका बारा चाकी ट्रक क्रमांक एम. एच. ४०, सी. एन-७११६ च्या ट्रक चालकास थांबवून तपासणी केली असता ट्रकमध्ये रेती भरलेली होती. ट्रक चालक निखीलला विचारपुस केली असता रेतीची रॉयल्टी किंवा ट्रकमधील रेतीच्या मालकी हक्काबाबत त्याच्याकडे कोणतेही कागदपत्र आढळले नाही.
ट्रक मालक कैलास सपाट रा. बर्डी, ता. आरमोरी. जि. गडचिरोली यांच्या सांगण्यावरून ही रेती आपण रणमोचन ब्रह्मपुरी घाट येथून आणल्याचे त्याने सांगितले. स्वत:च्या आर्थिक फायद्यासाठी शासकीय मालमत्ता असलेल्या रेतीची चोरी करून वाहतूक केल्याबद्दल आरोपी ट्रकचालक निखीलला अटक करण्यात आली. त्याच्या ताब्यातून ४० लाख रुपये किमतीचा ट्रक व सहा ब्रॉस रेती किंमत ४० हजार असा एकुण ४० लाख ४० हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पुढील तपास हुडकेश्वर पोलिस करीत आहेत.