लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : केंद्र शासनाने वाहतूकदारांच्या मागण्या मान्य केल्यानंतर आठ दिवसांपासून सुरू असलेला वाहतूकदारांचा संप शुक्रवारी मिटला. पण देशात ट्रक वाहतूक सुरळीत होण्यास आठवडा लागणार असल्याचे मत नागपूर ट्रकर्स यूनिटीचे अध्यक्ष कुक्कू मारवाह यांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केले.संप मिटल्यानंतर रस्त्यावर आठ दिवसांपासून उभे असलेले ट्रक रात्री ९ वाजेपासून रस्त्यावर धावत आहेत. काही मागण्यांवर सरकारच्या सकारात्मक भूमिकेमुळे नागपुरातील सर्व वाहतूकदारांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. संपामुळे गोदाम आणि बुकिंग कार्यालयाचे कामकाज संचालित होण्यास आठवडा लागणार आहे. संप मिटल्याची सूचना सर्व वाहतूकदारांना देण्यात आली आहे. संपादरम्यान नागपुरातील जवळपास १८ ते २० हजार ट्रक रस्त्यांवर उभे होते. शिवाय अन्य राज्यातून आलेले ट्रक चालकांनी रस्त्याच्या कडेला उभे केले होते.संपादरम्यान डिझेल विक्री ८० टक्के कमी झाली. शिवाय टोल नाके आणि धाबा मालकांना फटका बसला. संपामुळे ट्रक मालक आणि वाहतूकदारांचे तब्बल २०० कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. नुकसान भरून निघण्यास वर्ष लागणार आहे. सरकारने पूर्वीच चर्चा करून संप मिटविला असता तर हे नुकसान झाले नसते. पण सरकारच्या सकारात्मक धोरणामुळे वाहतूकदार आणि सर्वसामान्यांना दिलासा मिळाल्याचे मारवाह म्हणाले.