नागपूर : उन्हामुळे दुकानाच्या आडोशाला सावलीत उभ्या राहिलेल्या कचरा वेचणाऱ्याला हुसकावल्यानंतरही तो तेथून जात नसल्याने शुक्रवारी व्यापाऱ्याने केलेल्या जबर मारहाणीत शनिवारी त्याचा उपचाराअभावी मृत्यू झाला.भावेश, कचरा वेचून पोट भरत होता आणि रेल्वे स्थानकाजवळच्या फुटपाथवर झोपत होता. शुक्रवारी दुपारी तो पांडू उर्फ चंदू चौरसियाच्या दुकानाजवळ कचरा गोळा करीत होता. उन्हामुळे धाप लागल्याने तो दुकानाच्या शेजारी सावलीत बसला. पांडूने त्याला तेथून शिवीगाळ करून हाकलण्याचा प्रयत्न केला. भावेशने शिवीगाळ करू नका. थोड्या वेळाने जातो, असे सांगितले. त्यानंतर पांडूने त्याला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. त्यानंतर शेजारच्या दुकानदाराने मध्यस्थी करत भावेशला सोडवले आणि बाजूला नेऊन बसवले. शनिवारी सकाळी पांडू दुकान उघडण्यासाठी आल्यानंतर त्याला भावेश तेथेच बसलेला दिसला. त्याच्या नाकातोंडातून रक्त वाहत होते. तो मृत झाल्याचे लक्षात आल्यानंतर आजूबाजूची लोक जमा झाले. त्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहचले. त्यांनी जमावाला शांत केले. घटनेची माहिती घेतल्यानंतर संशयित व्यापाऱ्याला पोलिसांनी ताब्यात घेतले.बेदम मारहाणीमुळे अंतर्गत दुखापत झाल्याने भावेशचा मृत्यू झाला असावा, असा प्राथमिक अंदाज डॉक्टरांनी व्यक्त केला. शवविच्छेदनानंतर मृत्यूचे कारण स्पष्ट होईल. त्यानंतरच गुन्हा दाखल करण्यात येईल, असे पोलिसांनी सांगितले. (प्रतिनिधी)
व्यापाऱ्याच्या मारहाणीत कचरावेचकाचा मृत्यू
By admin | Published: May 22, 2016 3:58 AM