मेडिकल : सिटी स्कॅन, डिजिटल एक्स-रे दाखल नागपूर : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचा (मेडिकल) ‘ड्रीम प्रोजेक्ट’ ट्रॉमा केअर सेंटरमध्ये सात कोटी रुपयांचे सिटी स्कॅन आणि दीड कोटी कोटी रुपये किमतीचे ‘डिजिटल एक्स-रे’ दाखल झाले आहेत. त्याच्या ‘कॅलिब्रेशन’ची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे. येत्या दोन आठवड्यांत ही उपकरणे सेवेत दाखल होताच ट्रॉमाच्या खाटांची क्षमता आणखी ३० ने वाढणार आहे. ट्रॉमा केअर सेंटर सेवेत रुजू झाले आहे. पहिल्या टप्प्यात ३० खाटांच्या क्षमतेचे रुग्णालय कार्यान्वित झाल्यापासून अपघातातील गंभीर रुग्णांना हे सेंटर वरदान ठरत आहे. ट्रॉमाच्या खाटांची क्षमता ३० वरून ६० वर झाल्यानंतर येथे लवकरच अपघाती रुग्णांसाठी बाह्यरुग्ण विभाग कार्यरत केला जाणार आहे. ट्रॉमा युनिट तीन माळ्यांचे आहे. यात ९० खाटांचे तीन अतिदक्षता वॉर्ड बांधून तयार झाले आहेत. परंतु, टप्प्या टप्याने प्रत्येकवर्षी ३० खाटांचा ट्रॉमा सुरू होणार आहे. ट्रॉमात खाटांची संख्या ३० वर येऊन थांबली आहे. आता सिटी स्कॅन व एक्स-रे कार्यान्वित झाल्यास ३० खाटांची भर पडणार आहे. त्यानंतर अपघाती रुग्णांना थेट दाखल करून घेण्यावर भर दिला जाणार आहे.(प्रतिनिधी)
ट्रॉमाच्या खाटांची क्षमता ३०ने वाढणार
By admin | Published: February 19, 2017 2:48 AM