लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : रस्ते अपघातातील जखमींना पहिल्या तासात (गोल्डन अवर) तातडीने वैद्यकीय सोयी मिळाव्यात यासाठी मेडिकलचे ट्रॉमा केअर सेंटर जखमींसाठी वरदान ठरत आहे. राज्यात शासकीय रुग्णालयांमध्ये केवळ नागपुरातच मेडिकलचे ‘लेव्हल-१’ ट्रॉमा केअर सेंटर आहे. या सेंटरचे बांधकाम व तांत्रिक बाबींचा अभ्यास करण्यासाठी लातूर येथील जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाची चमू उद्या बुधवारी भेट देणार आहे. लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघात दोन ट्रॉमा केअर सेंटर प्रस्तावित असल्याने ही भेट महत्त्वाची मानली जात आहे.भारतात रस्ता अपघातातील मृत्यूची संख्या ही कुठल्याही आजाराच्या तुलनेत सर्वाधिक आहे. म्हणूनच अपघातातील जखमींना पहिल्या तातडीने वैद्यकीय सेवा मिळून त्यांना जीवनदान मिळण्यासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाने (मेडिकल) ‘ट्रॉमा केअर सेंटर’ सुरू केले. या सेंटरमध्ये गेल्या तीन वर्षांत ‘न्यूरोसर्जरी’, अस्थिव्यंगोपचार, सामान्य शल्यचिकित्सा, दंत शल्यचिकित्सा व ‘प्लास्टिक सर्जरी’चे प्रमाण वाढले आहे. विशेष म्हणजे येथे येणाऱ्या एकाही रुग्णांकडून शुल्क आकारले जात नाही. शासनाकडून वर्षाल जे ८ कोटी रुपये अनुदान दिले जाते त्यातून त्यांचा उपचाराचा खर्च भागविला जातो. या खर्चाच्या तुलनेत २०१७-१८मध्ये समाजाचे ४३ कोटी रुपये वाचविण्यात आले आहे. मेडिकलने सादर केलेल्या ‘वार्षिक आर्थिक निर्देशक’ातून हे वास्तव समोर आले आहे. यामुळे एक ‘आदर्श’ म्हणून मेडिकलचे ट्रॉमा केअर सेंटरकडे पाहिले जात आहे.मेडिकलच्या ट्रॉमाची माहिती लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघाचे आ. धीरज देशमुख यांनाही आहे. त्यांच्या क्षेत्रात ट्रॉमा केअर सेंटर प्रस्तावित आहे. याला शासनाची मंजुरीही मिळाली आहे. यामुळे हिवाळी अधिवेशनाच्या दरम्यान त्यांनी पाहणी केली होती. बांधकाम सुरू करण्यापूर्वी जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालय, लातूरला नागपूर ट्रॉमाचा अभ्यास करण्याचे त्यांनी सूचना केली आहे. त्यानुसार उद्या बुधवारी डॉक्टर, बांधकाम विभागाची एक चमू भेट देणार आहे. तसे पत्र कार्यालयाने मेडिकलचे अधिष्ठाता डॉ. सजल मित्रा यांना पाठविले आहे. ट्रॉमा केअर सेंटरचे प्रमुख डॉ. मोहम्मद फैजल यांच्याकडे पुढील जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
गेल्या वर्षी ४१६१ रुग्णांवर उपचारतळमजल्यासह तीन मजल्याच्या ट्रॉमा केअर सेंटरमध्ये ९० खाटा आणि ३७ व्हेंटिलेटर आहे. चार शस्त्रक्रिया गृह, दोन अतिदक्षता विभाग आहे. प्राप्त माहिनुसार गेल्या वर्षात ४१६१ रुग्णांवर उपचार करण्यात आले तर विविध १२१८ शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत.