लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : वर्धा रोडवर हॉटेल रेडिसन ब्ल्यूजवळ एका ट्रॅव्हल्स बसला अपघात झाला. या बसमध्ये जवळपास ४० प्रवासी असल्याची माहिती आहे. यात १० ते १२ प्रवासी जखमी झाले. जखमींना शहरातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. हा अपघात बुधवारी सकाळी घडला.ट्रॅव्हल्स बस एमएच २३, एच ६६०१ ही वर्धा रोडने येत होती. ती नरेंद्रनगरकडे जाण्यासाठी हॉटेल रेडिसन ब्ल्यू जवळून उलटली. तेव्हा अचानक ब्रेक फेल झाल्याने ती रस्त्याच्या बाजूला असलेल्या झुडपात जाऊन घुसली. प्रत्यक्षदर्शींनुसार ड्रायव्हरच्या सतर्कतेमुळे मोठा अपघात टळला. बसमधील १० ते १२ प्रवाशांनी जखमी झाल्याने लगेच पोलीस ठाण्याला सूचना देऊन रुग्णालयात दाखल करण्यात आले. सूचना मिळताच बेलतरोडी ठाण्याचे पोलीस घटनास्थळी पोहोचले. काही जखमींवर मेडिकलमध्ये तर काहींवर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहे.
महिलेस कारने चिरडले हिंगणा येथे पतीसह पायी रस्ता ओलांडत असलेल्या एका महिलेला भरधाव वेगात असलेल्या कारने चिरडले. यात महिलेचा मृत्यू झाला. मंदा लेखराम महाकाळकर (५०) रा. डोंगरगाव, हिंगणा असे मृत महिलेचे नाव आहे. मंदा त्यांचे पती लेखराम यांच्यासोबत मंगळवारी दुपारी डोंगरगाव बसस्टँडजवळ रस्ता ओलांडत होत्या. त्याच वेळी बुटीबोरीच्या दिशेकडे जात असलेल्या कारच्या (एमएच ३१/ईए/२८८९) चालकाने मंदा यांना धडक दिली. त्यांना रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. हिंगणा पोलिसांनी कार चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.