लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : बनावट ई-तिकिटावर प्रवास करणाऱ्या एका अभियंत्याविरुद्ध लोहमार्ग पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. राजधानी एक्स्प्रेसमधील टीटीईच्या कर्तव्यदक्षतेमुळे हा प्रकार उघडकीस आला.
वशिष्ठ महर्षी (२६) असे बनावट ई-तिकिटावर प्रवास करणाऱ्या अभियंत्याचे नाव आहे. त्याला रेल्वेगाडी क्रमांक ०२६९२ दिल्ली-बंगळूर राजधानी एक्स्प्रेसने भोपाळ ते सिकंदराबाद असा प्रवास करायचा होता. भोपाळ रेल्वेस्थानकावरून तो बी १० कोचमध्ये चढला. या गाडीत नवीन कुमार कुमावत हे टीटीई ड्युटीवर होते. भोपाळवरून गाडी सुटल्यानंतर त्यांनी अभियंत्याला तिकीट मागितले असता त्याने मोबाईलवरील तिकीट दाखविले. या तिकिटावर बी १०, बर्थ २० असे नमूद होते. परंतु टीटीईजवळील रेल्वेच्या चार्टवर असा कुठलाही पीएनआर नव्हता. विशेष म्हणजे या कोचमधील २० क्रमांकाचा बर्थही रिकामा होता. टीटीईने पुन्हा चार्ट तपासला परंतु त्यांना कुठेही अभियंत्याने दाखविलेला पीएनआर दिसला नाही. त्यामुळे त्याने वरिष्ठांना याबाबत माहिती दिली. नागपुरात गाडी थांबल्यानंतर या अभियंत्यास गाडीखाली उतरवून आरपीएफ ठाण्यात आणण्यात आले. आरपीएफने चौकशी करून त्यास लोहमार्ग पोलिसांच्या स्वाधीन केले. त्याच्याविरुद्ध भादंविच्या कलम ४६८ नुसार गुन्हा नोंदविण्यात आला.
असे बनविले तिकीट
वशिष्ठ हा मेकॅनिकल इंजिनिअर आहे. त्याने मोबाईलवर ई-तिकीट बनविले. ते दुसऱ्या मोबाईलवर पाठविले. कोणाला शंका येणार नाही असे हुबेहूब ई-तिकीट त्याने बनविले होते. परंतु टीटीईच्या कर्तव्यदक्षतेमुळे तो जाळ्यात सापडला. गुरुवारी लोहमार्ग पोलीस उपनिरीक्षक विजय तायवाडे यांनी टीटीई नवीन कुमार कुमावत, प्रमोद कुमार शॉ यांचे बयाण नोंदविले.