लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : लॉकडाऊनमुळे उद्योगधंदे बंद पडले. मालकानेही आता रोजगार नाही, तुम्ही थांबूही नका, असे सांगून जबाबदारीतून हात काढून घेतले. होते नव्हते त्या पैशात सायकल खरेदी केली. खाण्याचे सामान बांधले आणि मुलाबाळांना घेत नाशिकहून मध्यप्रदेशातील सतनाकडे प्रवास सुरू केला. नाशिकहून निघून ६ दिवस झाले ते मजूर अजूनही प्रवासातच आहेत.हे मजूर नाशिकमध्ये एका ठेकेदाराकडे काम करीत होते. लॉकडाऊनमुळे काम बंद पडले. त्यामुळे सायकलने हे कुटुंब आपापल्या गावाकडे निघाले आहे. यातील बिरेन कुशवाह हा युवक म्हणाला की, सायकलने निघताना अनेक अडचणी येत आहेत. सकाळपासून सायकल चालवावी लागले. मिळेल ते खावे लागते. कधी जंगलात तर कधी रस्त्यावर मुक्काम ठोकावा लागतो. गेल्या सहा दिवसांपासून दररोजचे हेच सुरू आहे. नाशिकच्या ठेकेदाराने काम नसल्यामुळे जाण्यास सांगितले. आता हा प्रवास करून घरी पोहचावे, एवढेच भरपूर आहे. बिरेनसारखे असे अनेक मजूर नागपूरसह इतरही जिल्ह्यांतून मध्य प्रदेशाकडे जाताना दिसत आहेत. कुणाची शेकडो किलोमीटरची पायपीट सुरू आहे. लहान लहान मुले, डोक्यावर गाठोडे, उन्हाचे चटके सोसत कधी जंगलातून, कधी रस्त्यावरून त्यांची भटकंती सुरू आहे.
नाशिक ते सतना सायकलने प्रवास! अजूनही सुरू आहे मजुरांचे स्थलांतरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2020 11:24 PM