मधुकरराव किंमतकर : नगरसेवकांच्या उपोषणाचा दुसरा दिवसरामटेक : स्थानिक पालिका प्रशासन लोकोपयोगी कामे करण्यात अपयशी ठरले आहे. त्यातच पालिकेने गेल्या तीन वर्षात मिळालेले ७५ लाख रुपयांचे यात्राकर अनुदान यात्रेकरुंच्या सोयीव्यतिरिक्त इतर कामांवर खर्च केले, असा आरोप माजी मंत्री अॅड. मधुकरराव किंमतकर यांनी केला. अॅड. किंमतकर यांनी शनिवारी दुपारी उपोषण मंडपाला भेट देऊन उपोषणकर्त्यांची चौकशी केली. त्यावेळी ते वृत्तपत्र प्रतिनिधींशी बोलत होते. उपोषणाचा दुसरा दिवस होता. विशेष म्हणजे ते १९५८ ते १९६३ या काळात रामटेक पालिकेत नगरसेवक होते.किंमतकर म्हणाले, आपण माहितीच्या अधिकारात गेल्या तीन वर्षात पालिकेला किती यात्राकर अनुदान मिळाले, याबाबत माहिती मागितली होती. हा निधी कुठे आणि कसा खर्च करावा, याबाबत शासनाकडून मार्गदर्शक सूचना दिलेल्या असतात. या सूचनांची माहिती मागितली. परंतु, ती देण्यात आली नाही. या पालिकेला २०११-१२ मध्ये ७ लाख ५० हजार रुपये, २०१२-१३ मध्ये २३ लाख ५८ हजार रुपये आणि २०१३-१४ मध्ये ४४ लाख ९१ हजार रुपये असे तीन वर्षांत एकूण ७५ लाख ९९ हजार रुपये यात्राकर अनुदान मिळाले. या अनुदानातून पालिकेने रामतलाई येथे लायटींगवर ४ लाख ६२ हजार रुपये खर्च केले. पालिका कार्यालय परिसरात हायमास्ट लाईटवर ८ लाख रुपये, आठवडी बाजार परिसरातील विद्युतीकरणावर ४ लाख २६ हजार रुपये, गांधी चौक ते शास्त्री चौकातील विद्युतीकरणावर ५ लाख ५३ हजार रुपये, गांधी चौक ते लंबे हनुमान विद्युतीकरणावर १० लाख ४९ हजार रुपये असा एकूण ७३ लाख ८९ हजार रुपयांचा खर्च यात्राकर अनुदानातून करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. गडमंदिराचे १ लाख रुपयांचे वीज बील सोडल्यास इतर कुठल्याही खर्चाशी यात्रेकरुंच्या सुविधेचा संबंध नसल्याचे किंमतकर यांनी स्पष्ट केले. इतर कामे ही यात्रेकर अनुदानात बसत नसल्याचा आरोप त्यांनी केला.ओमच्या देखाभाल व दुरुस्तीसाठी विदर्भ वैधानिक मंडळाने २ कोटींचा निधी दिला होता. ही वास्तु पालिकेकडे सोपविण्यात आली. २३ मार्च २०१० ला अवधेश तिवारी यांना ओमच्या देखभाल दुरुस्तीचा कंत्राट दिला. कंत्राटातील अटीनुसार ओमचा परिसर, कालीदास स्मारकाची देखभाल दुरुस्ती झाली नाही, असा आरोप किंमतकरांनी केला. अंबाळा येथे यात्री निवास बांधकामासाठी विदर्भ वैधानिक मंडळाच्या माध्यमातून १ कोटी ७ लाख ७३ हजार रुपये दिले. हे यात्री निवास अपूर्ण आहे. या संदर्भात आपण उपविभागीय अधिकारी शेखरसिंह यांना निवेदन दिल्याचे त्यांनी सांगितले. या प्रसंगी अशोक बर्वे, शांता कुमरे, सुरेश कुमरे, ईसराईल शेख, भाऊराव रहाटे, नरेश महाजन, मोहंमद पठाण, विष्णू अमृते आदी उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)
यात्राकर निधी इतर विकासकामांवर खर्च
By admin | Published: January 04, 2015 12:57 AM