लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : रेल्वेगाडीखाली जाऊन अपघात होत असलेल्या एका प्रवाशास प्लॅटफॉर्म क्रमांक १ वर उपस्थित टीटीईने समयसूचकता दाखवून वाचविल्याची घटना बुधवारी दुपारी ३.३० वाजता घडली.मिळालेल्या माहितीनुसार श्यामसिंह भदोरिया रा. ग्वाल्हेर भिंड हे दुपारी नागपूर रेल्वेस्थानकावर प्लॅटफॉर्म क्रमांक १ वर आंध्र प्रदेश एक्स्प्रेसने जाण्यासाठी आले. दुपारी ३.३० वाजता रेल्वेगाडी रवाना होत असताना भदोरिया अडखळत उलट दिशने पुढे जात होते. ते जनरल कोच येण्याची वाट पाहत होते. जनरल कोच येताच ते धावत जाऊन त्यात चढत होते. यावेळी त्यांचा हात निसटला आणि त्यांचे अर्धे शरीर रेल्वेगाडीत आणि अर्धे शरीर प्लॅटफॉर्मवर लटकत होते. प्लॅटफॉर्मवर उपस्थित हेड टीटीई शैलेंद्र सिंह हे भदोरियाच्या दिशेने सरसावले त्यांनी खाली पडून भदोरियाचे पाय पकडले. त्यानंतर दोघेही रेल्वेगाडीसोबत ओढल्या गेले. त्यावर दुसरे हेड टीटीई सय्यद इजहार हुसेन धावले आणि त्यांनी शैलेंद्र सिंह यांना हात देऊन भदोरियाला प्लॅटफॉर्मवर ओढले. दोघांच्याही समयसूचकतेमुळे एका प्रवाशाचा जीव वाचला. हेड टीटीई शैलेंद्र सिंह आणि सय्यद इजहार हुसैन दोघेही एकाच बॅचचे कर्मचारी आहेत. दोघेही खेळाडू असून हॉकी खेळतात. यातील शैलेंद्र सिंहला हॉकी खेळताना छातीवर जखम झाली होती. त्यांनी जखमेची चिंता न करता खाली पडून भदोरियाचा जीव वाचविला. हुसैन यांनीही माणुसकी दाखवून आपले कर्तव्य बजावले. या घटनेची आरपीएफ ठाण्यातील छायाचित्रीकरणाची क्लिप वाणिज्य विभागाला सोपविण्यात येणार आहे.
टीटीईच्या सतर्कतेमुळे बचावला प्रवासी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2017 12:57 AM
रेल्वेगाडीखाली जाऊन अपघात होत असलेल्या एका प्रवाशास प्लॅटफॉर्म क्रमांक १ वर उपस्थित टीटीईने समयसूचकता दाखवून वाचविल्याची घटना बुधवारी दुपारी ३.३० वाजता घडली.
ठळक मुद्देनागपूर रेल्वेस्थानकावरील घटना