ठळक मुद्देमहिलेचा मृत्यू : १४ जबर जखमी : तुकडोजी चौकात गेला स्कुटीचालकाचा बळी
लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुरुवारी सकाळी अवघ्या ४५ मिनिटात दोन भीषण अपघात घडले. उमरेड मार्गावर भरधाव बस टिप्परवर आदळली. त्यामुळे एका महिलेचा मृत्यू झाला तर १४ जण गंभीर जखमी आहेत. तत्पूर्वी, तुकडोजी चौकात एका वृद्ध स्कुटीचालकाचा टिप्परने बळी घेतला.नागपूरहून ब्रह्मपुरी, वडसाकडे प्रवासी घेऊन जाणाऱ्या खासगी प्रवासी बसचा (एमएच ४९/ जी १२१४) चालक आरोपी चेतन वढाई याने दिघोरीनंतर निष्काळजीपणे बस चालवणे सुरू केले. सकाळी ११ च्या सुमारास उमरेड मार्गावरील पांडव कॉलेजजवळ रस्त्याच्या उजव्या बाजूला एक टिप्पर (एमएच ४९/ एटी ०९३४) उभा होता. त्या टिप्परला बसचालकाने जोरदार धडक मारली. त्यामुळे बसमधील १५ प्रवासी जबर जखमी झाले. त्यांना मेडिकलमध्ये नेले असता शोभा पुरुषोत्तम राऊत (वय ४७, रा. अयोध्यानगर) यांचा मृत्यू झाला. राऊत आणि त्यांची विवाहित मुलगी ब्रह्मपुरीकडे जात होत्या. बसमधील किशोर मुरलीधर फाये (वय ४८, रा. झांशी राणी चौक, ब्रह्मपुरी), त्यांचे सासरे गजानन श्रावण येवले (वय ६५, रा. चामोर्शी, जि. गडचिरोली) यांनाही जबर दुखापत झाली. अपघातात आरोपी बसचालक वढाई हा जुजबी जखमी झाला. अपघातानंतर तणाव निर्माण होण्याचे संकेत मिळताच तो पळून गेला. माहिती कळताच हुडकेश्वरचे ठाणेदार सत्यवान माने आपल्या सहकाºयांसह तेथे पोहचले. तोवर या मार्गावरची वाहतूक अपघातामुळे प्रभावित झाली होती. तणावही होता. पोलीस उपायुक्त नीलेश भरणे हे सुद्धा तेथे पोहचले. त्यांनी संतप्त जमावाला शांत करून वाहतूक सुरळीत केली. जखमींना मेडिकलमध्ये रवाना करण्यात आले. तेथे काही वेळेत शोभा राऊत यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले. पोलिसांनी आरोपी बसचालक वढाईविरुद्ध गुन्हा दाखल केला. त्याचा शोध घेतला जात आहे.बसमधील जखमी प्रवाशांची नावेया अपघातात किशोर मुरलीधर फाये, गजानन श्रावण येवले, आरोपी बसचालक वढाई, विमल मुखिया (वय २८), संदीप राऊत (वय २३), रिना राऊत (वय २३), विक्की चव्हाण (वय २३), कल्पना शास्त्रकार (वय ४५), सुशीला वैद्य (वय ६०), समृद्धी डोईफोडे (वय १८), गजानन येवले (वय ६५), संतोष नेवारे (वय १८), किशोर गोये (वय ४८) आणि विजया विजय (वय ६२) हे प्रवासी जबर जखमी झाले असून, त्यांच्यावर मेडिकलमध्ये उपचार सुरू आहे.टिप्परने घेतला वृद्धाचा बळीतुकडोजी चौकात गुरुवारी सकाळी १०.१५ वाजताच्या सुमारास विनायक नत्थूजी कडू (वय ६५, रा. विणकर कॉलनी मानेवाडा) यांच्या स्कुटी (एमएच ३१ / डीबी ६११४)ला टिप्पर (एमएच ३१ / सीबी ९१४९)चालकाने जोरदार धडक मारली. त्यामुळे त्यांचा करुण अंत झाला. अत्यंत वर्दळीच्या ठिकाणी हा अपघात घडल्याने प्रचंड तणाव निर्माण झाला. मोठ्या संख्येत जमलेल्या संतप्त नागरिकांनी वाहतूक पोलिसांच्या हलगर्जीपणावर बोट ठेवून नारेबाजी सुरू केली. त्यामुळे चौकातील वाहतूक रखडली. माहिती कळाल्यानंतर हुडकेश्वर आणि अजनी पोलिसांचा ताफा पोहचला. त्यांनी मृतदेह मेडिकलमध्ये हलवून जमावाची कशीबशी समजूत काढली. अत्यंत वर्दळीचा चौक असूनही येथे वाहतूक पोलीस सतर्कपणे कर्तव्य बजावण्याऐवजी चौकाच्या आडोशाला सावज हेरण्याचे काम करीत असल्याचा आरोप जमावाने केला. विलास नत्थूजी कडू (वय ५७, रा. सर्वश्री नगर, दिघोरी) यांनी दिलेल्या तक्रारीवरून हुडकेश्वर पोलिसांनी आरोपी चंदू विठ्ठलराव येथेवार (वय ५५,रा. रामटेक) याला अटक केली.