नागपूर : हैदराबाद येथून नागपूर शहराकडे येणारी ट्रॅव्हल्स डिव्हायडरला धडक लागल्याने उलटली. यात ट्रॅव्हल्स चालकासह १० प्रवासी जखमी झाले. यातील एका प्रवाशाची प्रकृती चिंताजनक आहे. त्याला एम्स येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. जामठा शिवारात बेलाज सर्व्हिस कंपनीजवळ बुधवारी पाच वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला.
हैदराबाद ते रायपूरला जाणारी ट्रॅव्हल्स (सी.जी.-०४-एम.डी.८६५०) पहाटे नागपूरच्या दिशेने येत असताना चालक इकबाल खान (वय ४०, रा. निर्मल (तेलंगणा) याचे स्टेअरिंगवरील नियंत्रण सुटल्याने ट्रॅव्हल्स डिव्हायडरवर धडकली. यात वाहन उलटले. यात ट्रॅव्हल्स चालक व काही प्रवासी जखमी झाले. या मार्गाने जाणाऱ्या काही वाहन चालकांनी ट्रॅव्हल्समधून जखमी प्रवाशांना बाहेर काढले. अपघाताची माहिती मिळताच हिंगणा पोलिस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक गजानन तेलरांधे, अजय बरडे व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. या ट्रॅव्हल्समधून २५ जण प्रवास करीत होते. यातील १० प्रवासी किरकोळ जखमी झाले. त्यांना प्रथमोपचारानंतर सुटी देण्यात आली. मात्र, यातील एका प्रवाशाची प्रकृती चिंताजनक आहे. या ट्रॅव्हल्समधील प्रवासी अनुराग कमलाकर अय्यगारी वेंकट (३१, रा. भिलाई, जि. दुर्ग यांनी दिलेल्या माहितीनुसार हिंगणा पोलिसांनी ट्रॅव्हल्स चालक इकबाल खान याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. तपास ठाणेदार विशाल काळे यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे.