लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राज्यघटनेप्रमाणे ग्रामीण भागातील सामान्य नागरिकांना समानतेची वागणूक देऊन कामे करावीत, तसेच गावातील प्रत्येक कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न लाखात करण्याचे उद्दिष्ट ठेवून महात्मा गांधी नरेगा अंतर्गत समृद्धी बजेटचे योग्य प्रकारे अंमलबजावणी करण्यात यावी, असे आवाहन रोहयो विभागाचे अपर मुख्य सचिव नंदकुमार यांनी केले.
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना महाराष्ट्र आयुक्तालयाच्यावतीने वनामती प्रशिक्षण केंद्र नागपूर येथे आयोजित प्रशिक्षण कार्यशाळेला आभासी पद्धतीने मार्गदर्शन करताना ते बोलत हाेते.
या दोन दिवसीय प्रशिक्षण कार्यशाळेकरिता राज्यातील सर्व जिल्हा एम. आय. एस. समन्वयक आणि कार्यक्रम व्यवस्थापक यांना बोलवण्यात आले होते.
यात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना अंतर्गत मनरेगा संबंधित विविध विषयांवर तज्ज्ञ व्यक्तींकडून मार्गदर्शन करण्यात आले व क्षमता बांधणी करण्यात आली. नरेगा आयुक्तालयातील उपायुक्त (कृषी) एम. एल. चपळे, सहायक संचालक (लेखा) प्रशांत ढाबरे, नायब तहसीलदार सुनिता नंद, सांख्यिकी अधिकारी श्रीराम पाचखेडे, राज्य एम. आय. एस. समन्वयक अभय तिजारे, राज्य प्रशिक्षण समन्वयक नीलेश घुगे, राज्य मानव संसाधन समन्वयक दीप्ती काळे, सोशल कम्युनिकेशन स्पेशालिस्ट संकेत रामराजे, राज्य तांत्रिक समन्वयक वैभव गंपावार, वरून पिसे आदी उपस्थित होते.