लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ‘हिपेटायटिस ए’ आणि ‘ई’ मुळे कावीळ हा आजार होतो. औषधोपचार न करताही कावीळ ९९ टक्के बरा होतो. परंतु कावीळला घेऊन अनेक गैरसमज आहेत. यातच चुकीच्या जाहिरातीमुळे ३० ते ४० टक्के रुग्ण आयुर्वेदाच्या नावावर असामाजिक तत्त्वांकडून उपचार घेतात. यामुळे दोन आठवड्यात स्वत:हून बरा होणारा हा आजार गंभीर रूप धारण करतो. अनेकवेळा रुग्णाच्या जीवावरही बेतते. भारतात अशा मृत्यूचे प्रमाण १८ टक्के आहे. यामुळे रुग्णाने वैज्ञानिक उपचारावरच भर द्यावा, असे आवाहन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या गॅस्ट्रोएन्ट्रॉलॉजी विभागाचे सहयोगी प्राध्यापक डॉ. अमोल समर्थ यांनी केले.२८ जुलै हा दिवस जागतिक कावीळ दिवस म्हणून पाळला जातो. त्या निमित्ताने डॉ. समर्थ यांनी ‘लोकमत’शी संवाद साधला.डॉ. समर्थ म्हणाले, ‘बिलिरुबिन’च्या उच्चस्तरामुळे डोळ्याचा पांढरा भाग, त्वचा किंवा श्लेष्मल पडद्यात पिवळेपणा येतो, हे कावीळचे लक्षण आहे. कावीळला इंग्रजीत ‘जॉन्डिस’ म्हटले जाते. कावीळ हा यकृताचा (लिव्हर) आजार आहे. व्हायरलच्या संक्रमणात लिव्हरच्या पेशी अपयशी ठरल्याने हा आजार होतो. लिव्हरच्या गंभीर आजारांना दूर ठेवण्यासाठी तात्काळ निदान, योग्य लसीकरण आणि दारूच्या सेवनापासून स्वत:ला दूर ठेवेण आवश्यक ठरते.-कावीळचे पाच प्रकार‘हिपेटायटिस’ म्हणजेच कावीळ. याचे प्रामुख्याने पाच प्रकार आहेत. त्यामध्ये ‘हिपेटायटिस ए’, ‘बी’, ‘सी’,‘डी’ व ‘ई’ यांचा समावेश आहे. यातील ‘हिपेटायटिस बी’ आणि ‘सी’ हे विषाणू मानवी यकृतावर गंभीर परिणाम करतात. या दोन्ही विषाणूंचा संपर्क हा रक्ताशी अधिक येतो. ‘हिपेटायटिस बी’ हा आईकडून मुलाकडे, बाळाकडे संक्रमित होण्याचा धोका असतो. ‘हिपेटायटिस ए’ आणि ‘ई’ हे विषाणू तोंडावाटे शरीरात पोहोचतात. याला वैद्यकीय भाषेत ‘फेस्को ओरल ट्रान्समिशन’ म्हणून ओळखले जाते. या रु ग्णांना दूषित अन्नपदार्थ, पाण्यातून संसर्ग झालेला असतो.‘हिपेटायटिस’च्या विषाणूचा अभ्यास करून आता कुठे, १९७३ ते १९९०च्या दरम्यान माहिती उपलब्ध झाली आहे. यामुळे आयुर्वेदामध्ये या विषाणुबाबत उपचार करण्याची अपेक्षा करणे चुकीचे आहे. यातच आयुर्वेदाच्या नावावर अनेक असामाजिक तत्त्वे कोणत्याही प्रकारचा कावीळ मुळापासून संपविण्याचा दावा करतात. जडीबुटीच्या नावावर स्टेरॉईडची पावडर देतात. असे करणे धोकादायक आहे. ‘कावीळ झाडण्या’च्या नावावर अघोरी प्रक्रिया करतात. धक्कादायक म्हणजे, गेल्या काही वर्षांपासून ‘नाक्यावरील बाई’, इतवारी येथील कापडाचा दुकानात काम करणारा इसम, कावीळ पूर्णत: बरा करण्याच्या सर्रास जाहिराती करीत आहे. परिणामी, रुग्णांचा जीव धोक्यात आला आहे.-धोकादायक उपचारअसामाजिक तत्त्वे कावीळ बरा करण्याच्या नावावर कानात औषधी टाकणे, नाकात औषधी टाकणे, कावीळ झाडणे, पानात औषधी देणे, उलटीद्वारे कावीळ काढणे, शौचातून कावीळ काढणे, लघवीतून कावीळ काढणे आदी अघोरी प्रकार करतात. यामुळे जो रोग स्वत:हून बरा होऊ शकतो तो आणखी गंभीर होतो.-औषधांमध्ये २०-२५ रसायने असतातजी असामाजिक तत्त्वे आयुर्वेदाच्या नावावर औषधे देतात त्यात प्रमाणबद्धता (गुणोत्तर-रेशो) अचूक राहात नाही. औषधांमध्ये गुणवत्ता किंवा एकवाक्यताही राहात नाही. ‘क्वॉलिटी कंट्रोल’ तपासणाऱ्या यंत्रणेकडून याची तपासणी होत नाही. यातच औषधांमध्ये २० ते २५ रसायने राहात असल्याने रुग्णाच्या शरीराला आणखी अपाय करतात. यामुळे रुग्णाने जडीबुटी घेण्यापूर्वी एकदा तरी विचार करावा.-महत्त्वाचेहळद खाल्ल्याने कावीळ वाढत नाही.हिपेटायटिस ए आणि हिपेटायटिस ई मध्ये ‘पॅरासिटामोल’ गोळी घेऊ नये.‘हिपेटायटिस ए’ आणि ‘हिपेटायटिस ई’मुळे लीव्हर सिरोसीस होत नाही.कावीळपीडित रुग्णाने स्वयंपाक करू नये.केवळ उकळलेले अन्नपदार्थ देऊन रुग्णाला आणखी अशक्त करू नये.सलाईनचा उपयोग केवळ खूपच कमजोरी आली तरच करावा, सामान्य कावीळमध्ये करू नये.कावीळ झालेल्या रुग्णांनी तीव्र मसाले व अधिक तेलकट पदार्थांपासून दूर रहायला हवे.काही खाण्यापूर्वी नेहमी हात साबणाने स्वच्छ धुवावे.पाणी उकळून थंड करूनच प्यावे.