लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : वॉर्डात कोरोना विषाणूबाधित रुग्ण असल्याने आम्हाला हा आजार होईल, या भीतीपोटी चार संशयित रुग्ण रुग्णालयातूनच निघून गेले. शुक्रवारी रात्री घडलेल्या या प्रकाराने कोरोना पॉझिटिव्ह व संशयित रुग्णांवर एकाच वॉर्डात सुरू असलेल्या उपचारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. विशेष म्हणजे, महानगरपालिकेचे तीन मोठे दवाखाने रिकामे असताना, याकडे कुणीच लक्ष देत नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.कोरोना विषाणूची लागण झालेल्या रुग्णांची संख्या वाढत आहे. तीन दिवसात चार रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत. मेडिकलने कोरोनासाठी ४० खाटांचा वॉर्ड तर मेयोने २० खाटांचा वॉर्ड तयार केला आहे. सध्या मेडिकलच्या या वॉर्डात तीनपॉझिटिव्ह व एक संशयित रुग्ण, तर मेयोच्या वॉर्डात एक पॉझिटिव्ह व पाच संशयित रुग्ण उपचाराला आहेत. वाढत्या रुग्णांची संख्या पाहता भविष्यात खाटांमध्ये वाढ होणे आवश्यक आहे. परंतु तूर्तास तशी सोय नसल्याचे धक्कादायक वास्तव आहे.मेयोचा कोरोना वॉर्डाच्या इमारतीत मेडिसीनचाही वॉर्डमेयोचा कोरोनाचा वॉर्ड ब्रिटिशकालीन इमारतीला लागून असलेल्या इमारतीत आहे. ब्रिटिशकालीन इमारत धोकादायक अवस्थेत असल्याचा अहवाल आल्याने, ही इमारत नुकतीच रिकामी करण्यात आली आहे. परंतु या इमारतीला लागूनच असलेल्या दुसऱ्या इमारतीत मात्र दोन वॉर्ड अद्यापही सुरू आहेत. या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर कोरोनाचा वॉर्ड क्र. २४ आहे तर तळमजल्यावर औषधवैद्यकशास्त्र विभागाचा वॉर्ड आहे. कोरोना संशयित रुग्णांना याच वॉर्डासमोरून जावे लागते. मेयोत पॉझिटिव्ह रुग्णांसाठी स्वतंत्र कक्ष असले तरी वॉर्ड एकच असल्याने संशयितांसोबतच इतर रुग्णांनाही लागण होण्याची दाट शक्यता आहे.अतिदक्षता विभागासमोरच कोरोनाचा वॉर्डमेडिकलचा कोरोना विषाणूचा वॉर्ड क्र. २५ हा अगदी अतिदक्षता विभागासमोर (आयसीयू) आहे. आयसीयूमध्ये सद्यस्थितीत २० वर गंभीर आजाराचे रुग्ण आहेत. त्यांच्यासोबत त्यांच्या मदतीला नेहमीच रुग्णांचे नातेवाईक राहात असल्याने हा परिसर गजबजलेला असतो. शिवाय, वॉर्ड २५ मध्ये रुग्णासोबत संशयित रुग्ण ठेवले जात असल्याने, येथेही संशयितांसोबत इतरांनाही लागण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.मनपाचा आयसोलेशन वॉर्ड रिकामामनपाच्या इमामवाडा येथील आयसोलेशन वॉर्डात ४० खाटांची सोय आहे. हा वॉर्ड आयसोलेशन असला तरी येथे केवळ गॅस्ट्रोचे रुग्ण ठेवले जातात. सध्या एकही रुग्ण या वॉर्डात नाही.पाचपावली सुतिकागृहपाचपावली सुतिकागृह हे २० खाटांचे आहे. येथे प्रसूतीचे दोन किंवा तीनच रुग्ण असतात. येथेही संशयित रुग्णांना ठेवण्याची सोय होऊ शकते.इंदिरा गांधी रुग्णालयउत्तर अंबाझरी मार्गावर असलेल्या मनपाच्या इंदिरा गांधी रुग्णालयात २० खाटांची सोय आहे. येथे आकस्मिक विभाग आहे. परंतु रुग्णांची संख्या १० वर जात नाही. येथे केवळ सामान्य प्रसूतीच्या महिलांना भरती केले जाते. याची संख्याही तीनवर जात नाही. यामुळे या रुग्णालयाचा विचारही संशयित रुग्णांच्या उपचारासाठी होऊ शकतो.
नागपुरात एकाच वॉर्डात कोरानाबाधित व संशयितावर उपचार : लागण पसरण्याची भीती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2020 12:39 AM
वॉर्डात कोरोना विषाणूबाधित रुग्ण असल्याने आम्हाला हा आजार होईल, या भीतीपोटी चार संशयित रुग्ण रुग्णालयातूनच निघून गेले. शुक्रवारी रात्री घडलेल्या या प्रकाराने कोरोना पॉझिटिव्ह व संशयित रुग्णांवर एकाच वॉर्डात सुरू असलेल्या उपचारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
ठळक मुद्देबाधितावरील उपचारासाठी स्वतंत्र वॉर्डाची गरज