माओवादी साईबाबावर खासगी डॉक्टरद्वारे उपचार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2018 07:51 PM2018-12-10T19:51:48+5:302018-12-10T19:52:44+5:30
बेकायदेशिर कृत्य (प्रतिबंधक) अधिनियमांतर्गत जन्मठेपेची शिक्षा झालेला नक्षल चळवळीचा मास्टर माईन्ड प्रा. गोकलकोंडा नागा साईबाबा ऊर्फ जी.एन. साईबाबा याला स्वत:वर स्वत:च्या पसंतीच्या खासगी डॉक्टरद्वारे उपचार करून घेण्याची परवानगी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने सोमवारी दिली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : बेकायदेशिर कृत्य (प्रतिबंधक) अधिनियमांतर्गत जन्मठेपेची शिक्षा झालेला नक्षल चळवळीचा मास्टर माईन्ड प्रा. गोकलकोंडा नागा साईबाबा ऊर्फ जी.एन. साईबाबा याला स्वत:वर स्वत:च्या पसंतीच्या खासगी डॉक्टरद्वारे उपचार करून घेण्याची परवानगी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने सोमवारी दिली.
यासाठी साईबाबाला डॉक्टरचे नाव व त्याचा कार्यक्रम १७ डिसेंबरपर्यंत न्यायालयात सादर करावा लागेल. त्यानंतर साईबाबाला सरकारच्या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये भरती केले जाईल. त्या ठिकाणी संबंधित डॉक्टरला साईबाबावर उपचार करता येतील. या बाबी न्यायालयाने आपल्या आदेशात स्पष्ट केल्या. साईबाबाने खासगी डॉक्टरकडून उपचार करून घेण्यासाठी जामीन देण्याची विनंती केली होती. परंतु, न्यायालयाने ही विनंती अमान्य करून त्याला केवळ वरीलप्रमाणे दिलासा दिला. प्रकरणावर न्यायमूर्तीद्वय प्रदीप देशमुख व स्वप्ना जोशी यांच्यासमक्ष सुनावणी झाली.
साईबाबा ९० टक्के दिव्यांग आहे. ७ मार्च २०१७ रोजी गडचिरोली सत्र न्यायालयाने साईबाबा व त्याच्या साथिदारांना दहशतवादी कृत्याचा कट रचणे, दहशतवादी संघटनेला सहकार्य करणे, दहशतवादी संघटनेसाठी कार्य करणे इत्यादी गंभीर गुन्ह्यांमध्ये दोषी ठरवून जन्मठेप व अन्य विविध प्रकारची शिक्षा सुनावली आहे. उच्च न्यायालयात साईबाबातर्फे अॅड. मिहीर देसाई तर, सरकारतर्फे अॅड. प्रशांतकुमार सत्यनाथन यांनी कामकाज पाहिले.