नागपूर : सर्पदंशावर तातडीने व योग्य उपचार महत्त्वाचा ठरतो; परंतु आजही सर्पदंश झाल्यास विशेषत: ग्रामीण भागात सापाचे विष उतरवून देण्याचा दावा करणाऱ्या ढोंगी बाबांकडून उपचार करून घेतले जात आहेत. नुकतेच अशी दोन प्रकरणे समोर आली असून पहिल्या घटनेचा व्हिडिओही व्हायरल झाला आहे.
पहिली घटना बुटीबोरी क्षेत्रातील आहे. २८ ऑगस्ट रोजी ५२ वर्षीय व्यक्तीला विषारी सापाने दंश केला. त्यांच्या नातेवाइकांनी सर्पमित्राकडून मदत मागितली. त्यांनी रुग्णाला तातडीने मेडिकलमध्ये घेऊन जाण्यास सांगितले. परंतु रुग्ण मेडिकलमध्ये न येता कुठल्या तरी जडी-बुटीवाल्या बाबांकडे नेले. याचा व्हिडिओसुद्धा सोशल मीडियावर व्हायरल झाला.
दुसरी घटना गुरुवार, २ सप्टेंबरची आहे. मंगळवारी ३१ ऑगस्ट रोजी देवलापार, सलाईवेरा गावातील शेतात ५ वर्षीय मुलाला विषारी सापाने दंश केला. मुलाला मेयो रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचार सुरू असताना रुग्णाला अँटिव्हेनम इंजेक्शन दिले. परंतु बुधवारी मुलाच्या वडिलांना एका बाबाने फोन करून सापाचे विष उतरवून देण्यासाठी घरी बोलावले. सर्पमित्रांना याची माहिती मिळताच त्यांनी वडिलांना समजाविले; परंतु गुरुवारी सकाळी सात वाजता वडिलांनी रुग्णालयातून सुटी घेऊन देवलापार बाबाकडे उपचारासाठी नेले.
- रुग्णालयातच करावे उपचार
डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, कोणताही साप चावल्यावर तातडीने उपचाराची गरज पडते. उपचारात उशीर झाल्यास रुग्णाच्या जिवावर बेतण्याची शक्यता अधिक असते. यामुळे सापाचे विष उतरवून देण्याचा दावा करणाऱ्या ढोंगी बाबांवर विश्वास ठेवू नये. यात वेळ जातो, रुग्णही गंभीर होतो.