नागपूर : पंजाबराव देशमुख कृषी महाविद्यालयाच्या वतीने नागपूर सामाजिक वनीकरण नागपूर विभागाला वृक्षलागवडीसाठी कृषिवनशेती संशोधन प्रक्षेत्रातील ४ हेक्टर जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या जागेवर बुधवारी वृक्षलागवडीचा शुभारंभ करण्यात आला.
पंजाबराव कृषी विद्यापीठाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. पंचभाई यांच्या प्रमुख उपस्थितीत वृक्षलागवडीचा शुभारंभ झाला. यावेळी पंकृवितील शास्त्रज्ञ डॉ. इलोरकर, विभागीय वन अधिकारी गीता नन्नावरे, वनपरिक्षेत्र अधिकारी मनोज मोहिते उपस्थित होते.
या चार हेक्टर जागेवर कडुनिंब, करंज, शिसू, करंज पिंपळ, आवळा, सीताफळ, साग, पिंपळ इत्यादी स्थानिक प्रजातींच्या रोपांची लागवड केली जाणार आहे. वनपाल सोनटक्के व वनरक्षक कैलास सानप यांच्या देखरेखीखाली पुढील तीन वर्षे रोपांचे संगोपन देखभाल करून हे रोपण यशस्वी करू, असा विश्वास गीता नन्नावरे यांनी यावेळी व्यक्त केला.