ठळक मुद्देडी. के. गायेन यांची माहिती : रेल्वे कर्मचाऱ्यांमध्ये आरोग्याप्रति जागृतीसाठी शिबिरे
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : हिवाळ्यात दिल्ली मार्गावरील रेल्वेगाड्या आपल्या नियोजित वेळेपेक्षा उशिराने धावतात. यामुळे प्रवाशांची गैरसोय होऊन त्यांचे प्रवासाचे प्लॅनिंग बिघडते. त्यामुळे धुक्याचा बंदोबस्त करण्यासाठी त्रिनेत्र आणि ‘युटीसीएस’ (युरोपियन ट्रेन कंट्रोल सिस्टीम) यंत्रणेचा वापर नजीकच्या काळात करण्यात येणार आहे, असे प्रतिपादन रेल्वे बोर्डाचे सदस्य (स्टाफ) डी. के. गायेन यांनी केले.विभागीय रेल्वे व्यवस्थापक कार्यालयाच्या संवाद सभागृहात पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले, हिवाळ्यात रेल्वेगाड्यांच्या लेटलतिफीसाठी रेल्वे बोर्ड त्रिनेत्र ही यंत्रणा अवलंबण्याचा विचार करीत आहे. यानुसार धुक्याच्या परिस्थितीत पुढे सिग्नल येणार आहे, याची माहिती लोकोपायलटला मिळेल. त्यानुसार तो सिग्नल येण्यापूर्वी आपला वेग कमी करेल. ‘युटीसीएस’ या यंत्रणेनुसार लोकोपायलटला इंजिनमध्येच थांबायचे की पुढे जायचे, किती वेगाने जायचे याची माहिती मिळेल. सध्या रेल्वेत १३ लाख कर्मचारी कार्यरत आहेत. त्यांचे आरोग्य सांभाळणे रेल्वेची जबाबदारी आहे. त्यामुळे प्रत्येक विभागात वैद्यकीय शिबिरांचे आयोजन करून कर्मचाऱ्यांमध्ये आरोग्याप्रति जागृती निर्माण करण्यावर भर देण्यात येत आहे. सक्षम प्रकल्पानुसार रेल्वे कर्मचाऱ्यांना प्रशिक्षित करण्यात येणार आहे. ते जेथे काम करतात त्या ठिकाणी किंवा दुसऱ्या संस्थेत प्रशिक्षणाची व्यवस्था करण्यात येत आहे. याशिवाय स्कील इंडिया या प्रकल्पानुसार ३० हजार उमेदवारांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. रेल्वेत सफाई तसेच इतर बाबींचे कंत्राट खासगी कंत्राटदारांना देण्यात आलेले आहे. कंत्राटदार कामगारांची पिळवणूक करीत असतील तर त्यांच्यावर नजर ठेवण्यात येत आहे. कामगारांचे वेतन बँकेत जमा करुन त्या बाबतची माहिती पब्लिक डोमेनवर अपलोड करणे सक्तीचे करण्यात आले असून ईस्टर्न आणि साऊथ ईस्टर्न रेल्वेत त्याची चाचपणी सुरू असून ही यंत्रणा यशस्वी झाल्यास ती देशभरात लागू करण्यात येणार आहे. रेल्वेगाड्यात प्रवाशांसाठी विविध प्रकारच्या सुविधा वाढविण्यावर भर देण्यात येत असल्याचे गायेन यांनी सांगितले. यावेळी प्रधान मुख्य कार्मिक अधिकारी एन. स्वामीनाथन, मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाचे ‘डीआरएम’ बृजेश कुमार गुप्ता, अप्पर विभागीय रेल्वे व्यवस्थापक त्रिलोक कोठारी, दपूम रेल्वेचे ‘डीआरएम’ अमित कुमार अग्रवाल, जनसंपर्क अधिकारी प्रवीण पाटील, प्रसिद्धी निरीक्षक अनिल वालदे उपस्थित होते.