नागपूर : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (मेडिकल) राज्यस्तरीय ‘व्हायरल रिसर्च अॅण्ड डायग्नोस्टिक लॅबोरटरी’ने (एसव्हीआरडीएल) मंगळवारी एक लाख कोरोना संशयित रुग्णांच्या चाचण्यांचा टप्पा ओलांडला. ही प्रयोगशाळा नागपूर शहरासोबतच भंडारा, गोंदिया, चंद्रपूर व गडचिरोली या चार जिल्ह्यातील कोरोना संशयित रुग्णांचा भार सांभाळत आहे.
मेडिकलच्या ‘एसव्हीआरडीएल’ला जिल्हा आरोग्य संशोधन विभाग (डीएचआर) व भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने (आयसीएमआर) १४ मे २०१९ रोजी मंजुरी दिली. परंतु प्रत्यक्ष कामकाजाला ९ एप्रिल २०१९ रोजी सुरुवात झाली. कोरोना चाचणीसाठी स्वत: मेडिकलचे अधिष्ठाता डॉ. सजल मित्रा यांनी पुढाकार घेतला. त्यांच्या मार्गदर्शनात सूक्ष्मजीवशास्त्र विभागाच्या प्रमुख डॉ. सुनंदा श्रीखंडे, ‘एसव्हीआरडीएल’च्या प्रमुख डॉ. स्वाती भिसे, डॉ. संदीप कोकाटे, समन्वयक डॉ. नितीन ढोकणे यांच्या अथक परिश्रमातून हा टप्पा गाठण्यात आला.
‘लोकमत’शी बोलताना डॉ. श्रीखंडे म्हणाल्या, सुरुवातीला या लॅबची क्षमता १०० चाचण्यांची होती, परंतु नंतर ती वाढवून हजार करण्यात आली. या प्रयोगशाळेंतर्गत आरटीपीसीआर, सीबीनॅट, एबॉट मशीनचा वापर केला जातो. सीबीनॅटमुळे मृत रुग्णाचा अहवाल एका तासात दिला जातो. सध्या ही लॅब २४ तास रुग्णसेवेत सुरू आहे. संशयित रुग्णांच्या नमुन्यांच्या तपासणीसोबतच आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिले जाते. लॉकडाऊनच्या काळात जळगाव मेडिकलमधील कोरोना चाचणी लॅब सुरू करण्यासही मदत करण्यात आली होती.