लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : जागतिक आदिवासी दिनाच्या कार्यक्रमात काटकसर करण्याच्या परिपत्रकाचा निषेध करण्यात आला. त्याचबरोबर शासकीय कार्यक्रम साजरा करण्यासाठी आदिवासी समाजाकडून शासनास भिक स्वरूपात गोळा झालेली ११४ रुपयाची रक्कम प्रकल्प अधिकारी यांना सुपूर्द करण्यात आली. संयुक्त राष्ट्रसंघाने ९ ऑगस्ट हा दिवस जागतिक आदिवासी दिवस म्हणून घोषित केला. यानिमित्त विभागाकडून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत असते. परंतु यंदा कोरोनामुळे कार्यक्रमात काटकसर करण्यात यावी, यासंदर्भात आदिवासी विकास विभागाने परिपत्रक काढले. संघटनांचे म्हणणे आहे की, एकीकडे आलिशान गाड्या खरेदी करण्यासाठी तात्काळ मंजुरी व शासन निर्णय काढण्याची तत्परता शासनाने दाखविली आणि आदिवासींची अस्मिता जपण्यासाठी काटकसर करण्याचे परिपत्रक काढले. याचा निषेध म्हणून व काटकसर करताना किमान महापुरुषांना तरी हार अर्पण करण्यात यावा, यासाठी भीक मागून ११४ रुपयांचा गोळा केलेला निधी सहा. प्रकल्प अधिकारी भोंगाडे यांना सोपविण्यात आला. तसेच संघटनेच्यावतीने काही प्रलंबित मागण्यासंदर्भात निवेदन देण्यात आले. त्या पूर्ण न झाल्यास जागतिक आदिवासी दिनाला काळ्या फिती बांधून आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला. यावेळी दिनेश शेराम, श्याम कुमरे, विजय परतेकी, स्वप्निल मसराम, सुरेंद्र नैताम, यश मसराम, हर्षला कुमरे, ज्योती आडे, रामभाऊ आत्राम, दिवेश धूर्वे, संतोष आत्राम, प्रमोद उईके आदी उपस्थित होते.
आदिवासींनी केला आदिवासी विभागाचा निषेध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 04, 2020 9:21 PM