नागपूर : स्वातंत्र्य संग्राम सेनानी तथा लोकमत वृत्तपत्र समूहाचे संस्थापक संपादक जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबूजी यांना त्यांच्या जन्मशताब्दीनिमित्त आज (शनिवार) लोकमत भवन येथे आदरांजली वाहण्यात आली. याप्रसंगी लाईफ लाईन ब्लड बँकेच्या सहयोगाने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराचे उद्घाटन विभागीय आयुक्त डॉ. माधवी खोडे यांनी बाबूजींच्या प्रतिमेला माल्यार्पण करून केले.
लोकमत भवन येथे सकाळी १० वाजता बाबूजींच्या प्रतिमेपुढे दीप प्रज्वलन करून पुष्पांजली वाहण्यात आली. याप्रसंगी विभागीय आयुक्त डॉ. माधवी खोडेंसह, जिल्हाधिकारी आर. विमला, ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी, माजी आमदार व बाबूजींचे सहकारी यादवराव देवगडे, आमदार विकास ठाकरे, ‘लाईफलाईन ब्लड बँक कम्पोनंट आणि अप्रायसेस सेंटर’चे संचालक डॉ. हरीश वरभे, वनराई प्रतिष्ठानचे डॉ. गिरीश गांधी, माजी आमदार दिनानाथ पडोळे यांच्यासह 'लोकमत'च्या विविध विभागातील प्रमुख व लोकमत परिवारातील सदस्य उपस्थित होते.
रक्तदान शिबिराच्या उपक्रमातून गरजू रुग्णांची रक्ताची गरज पूर्ण करण्याचा सामाजिक हेतू आहे. सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत रक्तदान शिबिराचा उपक्रम सुरू राहणार आहे. शहरातील नागरिकांनी आणि वाचकांनी रक्तदान शिबिराच्या उपक्रमात सहभागी व्हावे, अशी विनंती लोकमत परिवाराच्या वतीने करण्यात आली आहे. आ. विकास ठाकरे, जिल्हाधिकारी आर. विमला यांच्यासह उपस्थित मान्यवरांनी शिबिराला भेट देत शुभेच्छा दिल्या.
जवाहरलालजी दर्डा यांचा जन्म २ जुलै १९२३ रोजी झाला. यंदाचे वर्ष त्यांचे जन्मशताब्दी वर्ष म्हणून पाळण्याचा निर्णय लोकमत व्यवस्थापनाने घेतला आहे. लोकमतच्या नागपूर आवृत्तीचे देखील हे सुवर्णमहोत्सवी वर्ष आहे. या दोन्ही पर्वांचा योग साधून लोकमतच्या वतीने वर्षभर विविध सामाजिक उपक्रमांचे आणि कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार आहे.
बाबूजींचे कार्य सर्वांसाठी प्रेरणादायी
जन्मशताब्दी वर्ष कार्यक्रमाच्या औचित्याने यवतमाळ जिल्ह्यासाठी व जनतेसाठी बाबूजींनी केलेले कार्य व योगदानाचे स्मरण झाले. त्यांनी स्थापन केलेल्या लोकमत समूहाने महाराष्ट्रासह देशभरात एक नवी झेप घेतली आहे. बाबूजींचे कार्य सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. त्यांच्या पाऊलवाटेवर लोकमतचे कार्य अविरतपणए सुरु राहावे. यासाठी खूप शुभेच्छा, अशा भावना विभागीय आयुक्तांनी यावेळी व्यक्त केल्या.
देशाच्या स्वातंत्र्यसंग्राम सैनिकांसाठी अभिमानाची बाब
बाबूजींच्या जन्मशताब्दी महोत्सवाची सुरुवात आजपासून होत आहे. देशाच्या स्वातंत्र्यसंग्राम सैनिकांसाठी अभिमानाची बाब आहे. बाबूजींच्या त्यागास प्रणाम, त्यांनी केलेले कार्य अविरत स्मरणात राहील, अशी भावना आ. विकास ठाकरे यांनी व्यक्त केली.