- पोलीस शिपाई भरतीपूर्व प्रशिक्षण आज
नागपूर : अल्पसंख्यांक विकास विभागाच्या वतीने जिल्ह्यातील अल्पसंख्यांक उमेदवारांसाठी पोलीस शिपाई भरतीपूर्व प्रशिक्षणाचे बुधवारी आयोजन करण्यात आले आहे. इच्छुक उमेदवारांनी सकाळी ११ वाजता जिल्हा मुख्यालय, पोलीस परेड मैदान, पोलीस लाईन टाकळी येथे आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. उमेदवार अल्पसंख्यांक समाजातील १८ ते २८ वर्षे वयोगटातील असावा. उमेदवाराने शैक्षणिक अर्हता, रहिवासी दाखला, आधार कार्ड, सेवायोजन नोंदणी दाखला, शाळा सोडल्याचा दाखला, अल्पसंख्यांक असल्याचा पुरावा इत्यादी कागदपत्रांच्या सत्यप्रती अर्जासोबत जोडणे आवश्यक असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी रवींद्र खजांजी यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली.
-०-०-०-
वीजदर सवलत मिळणाऱ्या यंत्रमाग घटकांना मुदतवाढ
नागपूर : राज्य शासनाच्या वस्त्रोद्योग धोरण २०१८-२०२३ अंतर्गत वीजदरात सवलत मिळण्यासाठी यंत्रमाग घटकांनी वस्त्रोद्योग आयुक्तालयाच्या संकेतस्थळावर २८ फेब्रुवारीपर्यंत ऑनलाईन अर्ज करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली असल्याची माहिती प्रादेशिक उपायुक्त स.ल. भोसले यांनी दिली. वस्त्रोद्योग धोरणांतर्गत वस्त्रोद्योग घटकांना वीजदर सवलत लागू करण्यात आली आहे. वीजदर सवलतीस पात्र असणाऱ्या यंत्रमाग घटकांना संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज करायचा आहे. या कालावधीत संबंधित यंत्रमाग चालकांनी ऑनलाईन नोंदणीसाठी अर्ज न केल्यास त्यांची नोंदणी करेपर्यंत ही वीजदर सवलत बंद करण्यात येईल, असेही त्यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.