नागपूर : ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी तथा लोकमतचे संस्थापक - संपादक स्व. जवाहरलालजी दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या जन्मशताब्दी वर्षाला शनिवार, २ जुलैपासून प्रारंभ होत आहे. यानिमित्त रक्तदानाच्या सामाजिक उपक्रमातून त्यांना श्रद्धांजली वाहिली जाणार असून, वर्षभर विविध कार्यक्रमदेखील आयोजित होणार आहेत.
लोकमत भवन येथे सकाळी १० वाजता बाबूजींच्या प्रतिमेपुढे दीप प्रज्वलन करून पुष्पांजली वाहिली जाईल. यावेळी शहरातील अनेक गणमान्य नागरिक उपस्थित राहणार आहेत. लाईफ लाईन ब्लड बँकेच्या सहयोगाने रक्तदान शिबिराचेही आयोजन करण्यात आले आहे. या सामाजिक उपक्रमातून गरजू रुग्णांची रक्ताची गरज पूर्ण करण्याचा यामागील हेतू आहे.
जवाहरलालजी दर्डा यांचा जन्म २ जुलै १९२३ रोजी झाला. यंदाचे वर्ष त्यांचे जन्मशताब्दी वर्ष म्हणून पाळण्याचा निर्णय लोकमत व्यवस्थापनाने घेतला आहे. लोकमतच्या नागपूर आवृत्तीचे देखील हे सुवर्णमहोत्सवी वर्ष आहे. या दोन्ही पर्वांचा योग साधून लोकमतच्या वतीने वर्षभर विविध सामाजिक उपक्रमांचे आणि कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार आहे.
शनिवारी लोकमत भवन येथे आयोजित करण्यात आलेल्या श्रद्धांजली कार्यक्रमाला शहरातील मान्यवरांसह वाचक व नागरिकांना देखील निमंत्रित करण्यात आले आहे. सकाळी १० ते दुपारी २ या वेळेत हा श्रद्धांजलीचा कार्यक्रम होणार आहे. तसेच सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत रक्तदान शिबिराचा उपक्रम देखील सुरू राहणार आहे. शहरातील नागरिकांनी आणि वाचकांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहावे तसेच रक्तदान शिबिराच्या उपक्रमात सहभागी व्हावे, अशी विनंती लोकमत परिवाराच्या वतीने करण्यात येत आहे.