लोकमत केवळ वृत्तपत्रसमुह नसून सातत्याने सामाजिक भावदेखील जपण्यावर भर असतो. लोकमतने सरसंघचालकांना आमंत्रित केले तेव्हा अनेकांना धक्का बसला.अनेकांनी मी बदललो आहे, असे म्हटले. परंतु अशी असहिष्णूता का हाच प्रश्न मला सतावतो आहे. सरसंघचालकांनी मोठे ह्रद्य दाखवत निमंत्रणाचा स्विकार केला व त्यांनी लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाचा आदर केला, अशा शब्दांत लोकमत एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन आणि माजी खासदार विजय दर्डा यांनी सरसंघचालक मोहन भागवत यांचे लोकमतच्या मंचावर स्वागत केले.
मोहन भागवत यांचे व्यक्तिमत्त्व अतिशय साधे व सरळ असून ते सर्वांसाठी प्रेरणादायी आहेत. संघाची लोकमान्यता त्यांच्या कार्यकाळात झाली असून संघाच्या विरोधकांचादेखील सन्मान करण्यात येतो. माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी संघाच्या कार्यक्रमासाठी नागपुरात येणार असताना मी त्यांना विचारणा केली होती, आपल्या विरोधकांना आमंत्रित करण्याचे धैर्य तेच लोक दाखवू शकतात ज्यांच्यात सखोल विचार करण्याची क्षमता आहे, असे त्यांचे उत्तर होते. आमच्या विचारांत मतभिन्नता आहे. आपले विचार दोन वेगवेगळे ध्रुव असले तरी लोकमत हा सर्वांचाच आहे, असे विजय दर्डा म्हणाले.
लोकमत नागपूर आवृत्तीच्या सुवर्णमहोत्सवानिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. हिंदुत्व आणि राष्ट्रीय एकात्मता या विषयावर डॉ. मोहन भागवत यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. यावेळी विजय दर्डा यांनी आपली भूमिका मांडली.
लोकमतचे संस्थापक संपादक व ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबूजी म्हणाले होते की संपादकीय पानाचाच तुम्हाला अधिकार आहे, उर्वरित पाने वाचकांसाठीच आहेत. लोकमत काँग्रेसचे वर्तमानपत्र आहे, असे म्हटले गेले. जात, धर्म, यांच्या नावाने काम होत नाही. लोकांच्या मनाचा ठाव घेतल्यावरच वाचक वर्तमानपत्र वाचतात. वर्तमानपत्र सर्वसमावेशक असायला हवे. आम्ही विचारपूर्वक सरसंघचालकांना बोलविले आहे. आम्ही तिरंगा, धर्मनिरपेक्षतेवर व संविधानावर विश्वास ठेवतो. तोच आमचा धर्म आहे व त्याचे पालन आम्ही करतो, असे प्रतिपादन विजय दर्डा यांनी केले. यावेळी विजय दर्डा यांनी यावेळी हिंदुत्वाबाबत जनसामान्यांच्या मनात असलेले प्रश्न सरसंघचालकांसमोर मांडले. विजय दर्डा यांनी उपस्थित केलेले जनसामान्यांच्या मनातील प्रश्न-- स्वातंत्र्यवीर सावरकर, संघ, बाळासाहेब ठाकरे, राहुल गांधी यांनी हिंदुत्वाची वेगवेगळी व्याख्या केली आहे. कोणते हिंदुत्व सर्वात चांगले आहे ?- अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्ष कमला हॅरिस म्हणाल्या होत्या की मीदेखील हिंदू आहे. मात्र भारतात ज्या हिंदुत्वाची चर्चा सुरू आहे ते खरे हिंदुत्व नाही. मग हिंदुत्व म्हणजे काय ?- वसुधैव कुटुंबकम् हा मंत्र जगाला देणाऱ्या भारतात आज असहिष्णूतेचे आरोप लागत आहेत. हिंदुत्वाची शैली बदलत आहे का ?- प्रेमाने एकता येईल की दुसऱ्यावर स्वतःचे विचार थोपून. अशा कृतीतून राष्ट्रीय एकता प्रस्थापित कशी होईल ?- संघाने स्थापनेपासून हिंदुराष्ट्राची कल्पना मांडली होती. आता राममंदिर पूर्ण झाले, कलम ३७० हटले. आता हिंदूराष्ट्राची कल्पनादेखील पूर्ण होईल का व जर असे होत असेल तर संघाची दिशा नेमकी काय आहे व असे झाल्यास देश एकसंघ राहील का ?- विविध विद्यापीठांत हिंदुत्वावर अभ्यासक्रम सुरू झाले आहेत. हिंदुराष्ट्राच्या परिकल्पनेला प्रत्यक्षात आणण्याच्या दिशेने हे पाऊल आहे का ?- दक्षिण भारतात तर अनेक मंदिरं आहेत, मग तेथे अद्याप भगवा का फडकलेला नाही ?-देश विश्वगुरू होण्याची चर्चा सुरू असताना दुसरीकडे जाती, धर्म, भाषेचे वाद दिसून येत आहे. धर्माच्या आधारवर ज्या देशांची निर्मिती झाली त्यांची दुर्दशा दिसून येत आहे. मग देशाला धर्माची ओळख देण्याचा आग्रह का केला जात आहे ?- हरिद्वारच्या धर्मसंसदेत जी भाषा वापरली गेली त्यामुळे राष्ट्रीय एकतेला धोका पोहोचणार नाही का, संघाने त्या द्वेषपूर्ण भाषणाचा निषेध का केला नाही ?- लव्ह जिहादवरून राजकारण होत आहे. प्रेमविवाहामुळे खरोखरच संस्कृतीला धक्का लागतो का ऑनर किलींग याचाच परिणाम तर नाही ना?