नागपूर : भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त १३ ते १५ ऑगस्ट दरम्यान नागपूर विभागात ‘ घरोघरी तिरंगा ’ मोहीम राबविण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत विभागातील शासकीय, निमशासकीय कार्यालये व खासगी आस्थापना आणि घरांवर सन्मानपूर्वक राष्ट्रध्वज फडकविण्यात येणार असून, नागरिकांनीही या कालावधीत राष्ट्रध्वज सन्मानपूर्वक फडकवून सहभागी व्हावे, असे आवाहन प्रभारी विभागीय आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी शुक्रवारी विभागीय आयुक्त कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत केले. यावेळी माहिती संचालक हेमराज बागुल, उपायुक्त आशा पठाण आदी अधिकारी उपस्थित होते.
या उपक्रमाच्या माध्यमातून देशाभिमान व जाणीव जागृतीची मोहीम प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. नागरिकांनी राष्ट्रध्वज स्वत: विकत घेऊन उभारण्यासाठी त्यांना प्रेरित करावे. भारतीय ध्वज संहितेचे पालन करावे असे आवाहन त्यांनी केले आहे.
- विभागात २८.८३ लाख घरांची संख्या
- नागपूर विभागात २८ लक्ष ८३ हजार ६४९ इतकी घरांची संख्या आहे. यात नागपूर जिल्ह्यातील ग्रामीण ३,७२,२६२, महापालिका ६,२८,२४५,अशी एकूण १० लक्ष ५०७ वर्धा ३,३०,८३३, भंडारा ३,१६,६६२, गोंदिया ३,५५,५९४, चंद्रपूर ग्रामीण ३,९७,०३४ आणि महापालिका १,८४,६१५असे एकूण ५,८१,६४९ आणि गडचिरोली जिल्ह्यात २,९८,४०४ इतकी आहे. तसेच विभागात प्राथमिक शाळा, माध्यमिक शाळा, उच्च माध्यमिक शाळा, रुग्णालये, औषधालये, सहकारी संस्था, जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायती, अंगणवाडी, उपकेंद्र, प्राथमिक आरोग्य केंद्र अशा २६,६२० विविध आस्थापना आहेत.
विभागात २४ लाख ६७ हजार ७१८ तिरंगा ध्वजांची मागणी असून आतापर्यंत २३,४५,१४६ ध्वज प्राप्त झाले आहेत. १ लाख २२ हजार ध्वज आणखी प्राप्त होतील. ध्वजाचे वितरण सुरु झाले आहे.
- ध्वजाचे शुल्क जिल्हानिहाय
वेगवेगळे विभागामध्ये १७ लाख ९७ हजार ६७५ राष्ट्रध्वज सशुल्क मिळणार आहेत. विविध जिल्ह्यात त्याचे शुल्क वेगवेगळे आहे. नागपूर जिल्हा २५ रुपये, वर्धा ४०, भंडारा ३०, गोंदिया ३२, चंद्रपूर २५ आणि गडचिरोली जिल्ह्यात २० रुपये प्रती ध्वज असा ३ :२ या आकारातील राष्ट्रध्वजांचा दर राहणार आहे. बचत गट, ग्रामपंचायत निधी, आपले सरकार सेवा केंद्र व शासनाकडून १२ लाख ६८ हजार ६५६ तिरंगा सशुल्क तर उर्वरित ५ लक्ष २९ हजार १९ हे देणगी स्वरुपात प्राप्त होणार असल्याचे राधाकृष्णन बी यांनी सांगितले.
- येथे मिळणार तिरंगा, ४,४७१ केंद्र
नागपूर विभागात एकूण ४,४७१ केंद्रांवर तिरंगा विक्रीसाठी उपलब्ध होणार आहेत. ग्रामपंचायत, नगरपरिषद, महानगरपालिका विभाग, पंचायत समिती, शाळा, स्वस्त धान्य दुकान, प्राथमिक आरोग्य केंद्र, तलाठी कार्यालये आदी ठिकाण हे विक्री केंद्र राहतील.
- महत्त्वाचे मुद्दे
- राष्ट्रध्वज सन्मानपूर्वक फडकविला जाईल, याची दक्षता घ्यावी.
- राष्ट्रध्वज हाताने कातलेला, हाताने बनविलेला किंवा मशीनद्वारे तयार केलेल्या सूत, पॉलिस्टर, लोकर, सिल्क व खादी यापैकी कापडापासून तयार केलेला असावा.
- राष्ट्रध्वजाचा आकार आयताकृती असेल व झेंड्याची लांबी व रुंदी ३:२ या प्रमाणात राहील.
- २० जुलै २०२२ च्या शासनाच्या सूचनेनुसार राष्ट्रध्वज १३ ते १५ ऑगस्ट २०२२ हे तीन दिवस घरोघरी फडकविताना दररोज सायंकाळी खाली उतरविण्याची आवश्यकता नाही. परंतु कार्यालयांना यासंबंधी ध्वजसंहिता पाळावी लागेल.
- राष्ट्रध्वज फडकविताना केशरी रंग आकाशाकडे वर असावा आणि हिरवा रंग जमिनीच्या दिशेने खाली असावा.
- राष्ट्रध्वज चढविताना लवकर चढवावा व उतरविताना सावकाश उतरवावा.
- जेव्हा ध्वज फाटला असेल किंवा मळाल्यामुळे खराब झाला असेल तेव्हा त्याची प्रतिष्ठा राखली जाईल अशा अन्य कोणत्याही पद्धतीने तो खाजगीरीत्या संपूर्णपणे नष्ट करावा.
- राष्ट्रध्वजाच्या दोन्ही बाजूस समान पांढऱ्या पट्टीच्या पूर्णतः मध्यभागी २४ आऱ्यांचे गर्द निळ्या रंगाचे अशोक चक्र दिसेल असा ध्वज असावा.