कस्तूरचंद पार्कवर २०० फूट उंच राष्ट्रध्वजनागपूर : लोकमत वृत्तपत्र समूह व महापालिका यांच्या संयुक्त विद्यमाने कस्तूरचंद पार्क येथे २०० फूट उंच राष्ट्रध्वज उभारण्यात येत आहे. ही नागपूरसाठी अभिमानास्पद बाब आहे. युवकांमध्ये देशप्रेम, देशभक्ती जागविण्यासाठी हा तिरंगा प्रेरणादायी ठरेल. येथे उभारण्यात येणारा राष्ट्रध्वज येत्या काळात नागपूरच्या इतिहासातील अभिमानास्पद ओळख बनेल, असे गौरवोद्गार केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी काढले.लोकमत वृत्तपत्र समूह व नागपूर महापालिका यांच्या संयुक्त विद्यमाने कस्तूरचंद पार्क येथे उभारण्यात येणाऱ्या राष्ट्रध्वजासह २०० फूट उंच ध्वजस्तंभ प्रकल्पाचे भूमिपूजन केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाज बांधणी मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते शुक्रवारी करण्यात आले. अध्यक्षस्थानी महापौर प्रवीण दटके होते. विशेष अतिथी म्हणून लोकमत एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन माजी खासदार विजय दर्डा उपस्थित होते. लोकमतने सामाजिक बांधिलकी जपली : गडकरीलोकमत वृत्तपत्र समूहातर्फे समाज व देशहित डोळ्यासमोर ठेवून विविध उपक्रम राबविले जातात. देशसेवेच्या प्रत्येक उपक्रमात लोकमतचा पुढाकार असतो. मोवाड पूर, लातूर भूकंप, कारगीलचे युद्ध आदी प्रसंगी लोकमतने मदतीसाठी घेतलेला पुढाकार सर्वांनीच अनुभवला आहे. पुन्हा एकदा या राष्ट्रध्वज प्रकल्पाच्या माध्यमातून लोकमतने आपली समाज व देशाप्रती असलेली बांधिलकी स्पष्ट केली आहे, अशा शब्दात नितीन गडकरी यांनी लोकमतची प्रशंसा केली. या प्रकल्पासाठी त्यांनी शुभेच्छा दिल्यात. यावेळी त्यांनी देशवासीयांसह सैनिकांनाही दीपावलीच्या शुभेच्छा दिल्यात. नव्या पिढीत राष्ट्रप्रेम जागविणार : विजय दर्डा धनत्रयोदशीच्या शुभ मुहूर्तावर देशाची कर्मभूमी, मर्मभूमी व हृदयस्थळ झिरो माईल असलेल्या नागपूर शहरातील कस्तूरचंद पार्कवर राष्ट्रध्वज उभारण्याच्या प्रकल्पाचे भूमिपूजन करण्यात आले. नव्या पिढीत राष्ट्रप्रेमाची भावना जागृत करणे, त्यांना तिरंग्याचे महत्त्व समजावे या उद्देशाने हा प्रकल्प उभारला जात आहे, असे लोकमत एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन माजी खासदार विजय दर्डा यांनी सांगितले. संसदेतही तिरंगा बॅच लावून प्रवेश मिळावा यासाठी आपण गेली १८ वर्षे आग्रह धरला. शेवटी त्यात यश मिळाले. कस्तूरचंद पार्कवर उभारण्यात येणारा राष्ट्रध्वज पाहून राष्ट्रभक्तीची प्रेरणा मिळेल. आपण विजय मिळवितो तेव्हा तिरंग्याच्या साक्षीने जल्लोष करतो. हा तिरंगा विजयाचेही प्रतीक ठरेल. येत्या काळात हे एक प्रेक्षणीय स्थळदेखील होईल, असेही दर्डा यांनी सांगितले.
नागपूरची ओळख बनणार तिरंगा
By admin | Published: October 29, 2016 2:16 AM