लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : पश्चिम बंगालच्या निवडणुकीत राज्य पोलिसांना मतदान केंद्रांच्या १०० मीटर आत तैनात न करण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतला आहे. सत्ताधारी तृणमूल काँग्रेसने यासंदर्भात नाराजी व्यक्त केली असून, शुक्रवारी ‘तृणमूल’च्या खासदारांनी निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली. पश्चिम बंगालमध्ये निष्पक्ष निवडणुका हे फार दूरचे वास्तव असून, ही जबाबदारी आयोग कशी पार पाडणार आहे, असा सवाल यावेळी त्यांनी केला.
या शिष्टमंडळात सौगत्त रॉय, यशवंत सिन्हा, मो. नदिमुल हक, प्रतिमा मंडल आणि महुआ मोईत्रा हे होते. निवडणूक आयोगाची एकूण भूमिका पक्षपाती आहे. पश्चिम बंगालमध्ये स्वतंत्र, निष्पक्ष व पारदर्शक निवडणूक प्रक्रिया होणार नाही, असेच चित्र आहे. केवळ निवडणूक आयोगाच्या धोरणामुळे असे होणार असल्याचा आरोप ‘तृणमूल’तर्फे लावण्यात आला आहे. मतदान केंद्राच्या १०० मीटरच्या आत केंद्रीय व राज्य सुरक्षा दलाच्या जवानांना तैनात करण्यात यावे. ईव्हीएमसोबत १०० टक्के व्हीव्हीपॅटची चाचपणी व्हावी. तसेच मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर नंदीग्राम येथे झालेल्या हल्ल्याबाबत सखोल अहवाल जारी करण्यात यावा, अशी मागणीदेखील शिष्टमंडळातर्फे करण्यात आली.