रामटेक (नागपूर) : कार्तिक पौर्णिमेच्या पर्वावर रामटेकच्या गडमंदिरावरील कळसावर त्रिपूर जाळण्यात आले. हा क्षण पाहण्यासाठी भाविकांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती. राम मंदिराचे मुख्य पुजारी मोहन पांडे यांच्या हस्ते त्रिपूर जाळण्यात आला.
कार्तिक पौर्णिमेला देवांचे वापरलेले वस्त्र तुपात भिजवून मंदिराच्या कळसावर जाळले जातात. सोमवारी मध्यरात्री वाजता त्रिपूर १२ जाळल्यानंतर देवाला नवीन वस्त्रे व अलंकार परिधान केले गेले. यावेळी गडमंदिरावर फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली.
रामटेक येथे सायंकाळी रामकृष्ण रथाची मिरवणूक काढण्यात आली. यावेळी भारतीय जनसेवा मंडळाचे अध्यक्ष चंद्रपाल चौकसे यांनी पादुका व ग्रंथाचे पूजन केले. नागरिकांनीही रामकृष्ण रथाचे दर्शन घेतले. रामकृष्ण रथाचे समापन धार्मिक मैदान रामतलाई येथे झाले. यावेळी महाआरती व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.
रामटेक येथे तीन दिवसीय महोत्सवाची सांगता मंडईने झाली. रामटेकच्या बाजारात विविध कलावंतांनी तमाशे सादर करीत नागरिकांचे मनोरंजन केले. नगरपालिकेच्या वतीने कलावंतांचा सत्कार करण्यात आला. गडमंदिरावर गत ४२ वर्षांपासून रामगिरी सेवा समिती तर्फे रोषणाई केली जाते. यावर्षीही देखणी रोषणाई करण्यात आली.