ठळक मुद्देबिप्लब कुमार देब : दीक्षाभूमी, संघ मुख्यालयाला दिली भेट
लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : आसाममध्ये लागू करण्यात आलेल्या ‘एनआरसी’वरुन( नॅशनल रजिस्टर आॅफ सिटीझन्स) राजकारण तापले असताना त्रिपुराचे मुख्यमंत्री बिप्लब कुमार देब यांनी नेमके विरोधात वक्तव्य केले आहे. आसामप्रमाणे त्रिपुरामध्ये ‘एनआरसी’ची अजिबात आवश्यकता नाही. आमच्या राज्यात बेकायदेशीर स्थलांतरित नाही, असेदेखील त्यांनी स्पष्ट केले. बिप्लब कुमार देब यांनी मंगळवारी दीक्षाभूमी व संघ मुख्यालयाला भेट दिली. संघ स्मृतिमंदिरात त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना वरील वक्तव्य केले.आसामप्रमाणे ईशान्येकडील इतरही राज्यांमध्ये ‘एनआरसी’ तयार होणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. या धर्तीवर देब यांनी त्रिपुरात असे काही होणार नाही, असे सांगितले. त्रिपुरामध्ये ‘एनआरसी’ची कुठलीही मागणी नाही. आमच्या राज्यात बेकायदेशीर स्थलांतरित लोक नाहीत. सर्व नागरिकांकडे योग्य कागदपत्रे आहेत. आसाममध्येदेखील ही फारशी संवेदनशील बाब नाही. मात्र आता याचे राजकारण करण्यात येत असून विदेशी मानसिकतेचे काही लोक वातावरण गढूळ करण्याचा प्रयत्न करत आहेत, असा आरोप त्यांनी केला.देब यांच्या हिंदीचा झाला लोच्याबिप्लब कुमार देब यांनी हिंदीत प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. मात्र हिंदीत बोलत असताना ते थोडे अडखळले व आपल्याच पक्षाच्या मुख्यमंत्र्यांवर त्यांनी नकळतपणे टीका केली. आसाममध्ये फार संवेदनशील बाब आहे, असे मला वाटत नाही. या मुद्द्यावरुन धास्ती निर्माण करण्यात सर्बानंद सोनोवाल हे सक्षम नेते आहेत, असे वक्तव्य त्यांनी केले. काही वेळाने त्यांनी यात सुधारणा केली.सरसंघचालकांची घेतली भेटबिप्लब कुमार देब यांनी सकाळी दहाच्या सुमारास राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्मृतिमंदिराला भेट दिली. यावेळी त्यांनी आद्य सरसंघचालक डॉ.केशव बळीराम हेडगेवार व द्वितीय सरसंघचालक गोळवलकर गुरूजी यांच्या समाधीस्थळाचे दर्शन घेतले. त्यानंतर संघ मुख्यालयात जाऊन त्यांनी सरसंघचालक डॉ.मोहन भागवत यांची भेट घेतली. सुमारे तासभर ते मुख्यालयात होते. मुख्यमंत्री झाल्यानंतरची त्यांची ही पहिलीच भेट होती.बाबासाहेब आंबेडकर हे राष्ट्रपुरुषसंघ मुख्यालयातून देब हे थेट दीक्षाभूमी येथे गेले व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र अस्थीकलशाचे दर्शन घेतले. बाबासाहेब आंबेडकर हे राष्ट्रपुरुष होते. त्यांच्यामुळे देशात लोकशाही रुजली व दीक्षाभूमीत येऊन लोकशाहीचा खरी भावना समजते आहे. नागपुरातील लोक फार भाग्यवान आहेत, असे उद्गार त्यांनी यावेळी काढले.