अमरावतीतील घटना : दिल्ली-सिक्कीमच्या विद्यार्थ्यांमध्ये धुमश्चक्री अमरावती : आशिया खंडातील सर्वात मोठी क्रीडासंस्था म्हणूून ओळखले जाणाऱ्या स्थानिक श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळात शनिवारी सकाळी ११.३० वाजताच्या सुमारास दिल्ली-सिक्कीमच्या विद्यार्थ्यांचे दोन गट समोरासमोर आले. क्षुल्लक कारणावरून निर्माण झालेला वाद टोकाला पोहोचल्याने झालेल्या हाणामारीत तब्बल १० विद्यार्थी जखमी झाले तर हव्याप्र मंडळाचे प्रधान सचिव पद्मश्री प्रभाकरराव वैद्य हेदेखील झटापटीत जखमी झालेत. जखमी विद्यार्थ्यांमध्ये पिंम्पा थेरसिंग (२३), सुभालाल राई गोविंदसिंग (२२), शिशिर चैत्री (२१), प्रमेश राजू चैत्री (२३), लाखो राय सिरीन (२१) सर्व रा. सिक्कीम, मयूर अनिल कुमार (२२, रा. एस.पी. रोड, दिल्ली) व अन्य ९ जणांचा समावेश आहे. हव्याप्र मंडळात विविध क्रीडा प्रकारांचे पदवी व पदव्युत्तर शिक्षण घेण्यासाठी देशाच्या विविध प्रांतातून विद्यार्थी येतात. येथील वसतिगृहात त्यांचा मुक्काम असतो. अनेकदा त्यांच्यामध्ये क्षुल्लक कारणावरून किरकोळ वाद उद्भवतात. पण, शिक्षकांच्या मध्यस्थीनंतर लगेच प्रकरण मिटतात. शनिवारी सकाळी येथील वसतिगृहातील स्नानगृहात आंघोळ करण्यावरून दिल्ली व सिक्कीमच्या दोन विद्यार्थ्यांमध्ये वाद व हाणामारी झाली. हे दोन्ही विद्यार्थी बीपीएडच्या प्रथम वर्षाला शिकतात. सिक्कीमच्या विद्यार्थ्याला मारहाण झाल्याचे कळताच मणीपूर, उत्तर प्रदेश व सिक्कीमच्या अन्य विद्यार्थ्यांनी सकाळी ११.३० वाजताच्या सुमारास हव्याप्र मंडळाच्या बाहेरील वीर वामनराव जोशी शाळेजवळील असलेल्या वसतिगृहातील दिल्लीच्या विद्यार्थ्यांवर हल्लाबोल केला. दोन्ही गट आक्रमक झाले. क्षणात राडा सुरू झाला. काही विद्यार्थ्यांनी एकमेकांवर लाठ्या काठ्यांनी हल्ला केला. काहींनी दगड, विटांचा मारा केला. यात अनेक विद्यार्थी जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच हव्याप्र मंडळाचे पदाधिकारी व शिक्षक घटनास्थळी पोहोचले. (प्रतिनिधी)गांधी चौकातही धांदलहाणामारी सुरु असताना बचावात्मक पवित्रा घेऊन काही विद्यार्थ्यांनी गांधी चौकाकडे पलायन केले. तर दुसऱ्या गटाने त्यांचा पाठलाग करून मारहाण केली. यामुळे गांधी चौकात बघ्यांची गर्दी उसळली होती. दोन वर्षांतील दुसरी घटनाहव्याप्र मंडळात विविध राज्यांतून विद्यार्थी शारीरिक शिक्षण घेण्याकरिता येतात. त्यांच्यामध्ये अनेकदा वाद निर्माण होतात. गेल्या वर्षी काही विद्यार्थ्यांनी मद्यप्राशन करुन विद्यार्थीनीची छेड काढली होती. तेव्हा राडा झाला होता.
हव्याप्रत दंगल, १५ जखमी
By admin | Published: December 14, 2014 12:46 AM