नागपूर : माल वाहतूक करणाऱ्या भरधाव वाहनाने धडक दिल्यामुळे अॅक्टीव्हावरील महिला गंभीर जखमी झाली. ही घटना सदर पोलिस ठाण्याच्या हद्दीत शुक्रवारी सकाळी १०.३० वाजताच्या सुमारास घडली. रजिया खान दराज खान (वय ४६, रा. हमीदनगर, गोरेवाडा) असे गंभीर जखमी झालेल्या महिलेचे नाव आहे. त्या आपल्या अॅक्टीव्हा गाडी क्रमांक एम. एच. ३१, एफ. डब्ल्यू-५२४५ ने सदर पोलिस ठाण्याच्या हद्दीत राजभवन चौक येथून जात होत्या.
तेवढ्यात पांढऱ्या रंगाच्या चारचाकी माल वाहतूक करणाऱ्या वाहनाच्या चालकाने आपल्या ताब्यातील वाहन भरधाव वेगाने व निष्काळजीपणे चालवून रजिया यांच्या दुचाकीला मागून धडक दिली. रजिया खाली पडून त्यांच्या उजव्या पायाला गंभीर दुखापत झाली. घटनेनंतर वाहनचालक घटनास्थळावरून पळून गेला.
रजिया यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आले. याबाबत त्यांनी रविवारी २४ डिसेंबरला दिलेल्या तक्रारीवरून सदर पोलिसांनी आरोपी वाहन चालकाविरुद्ध कलम २७९, ३३८, सहकलम १३४, १७७ नुसार गुन्हा दाखल करून त्याचा शोध सुरु केला आहे.