लाेकमत न्यूज नेटवर्क
बुटीबाेरी : ट्रकचालकाने पार्किंग शुल्क देऊन त्याचा ट्रक एमआयडीसी परिसरात उभा केला. काही वेळाने पार्किंग कंत्राटदाराच्या दाेन माणसांनी त्याला पुन्हा पार्किंग शुल्कची मागणी केली. त्याने नकार देताच त्या दाेघांनी ट्रकचालक व क्लीनरला बेदम मारहाण केली. त्यात दाेघेही जखमी झाले. ही घटना बुुटीबाेरी एमआयडीसी परिसरात बुधवारी (दि. २) दुपारी घडली.
प्रमोद रामखिलावन सिंह, रा. टेकानाका, नागपूर असे जखमी ट्रकचालकाचे तर नीरज भोयर व समीर काळे, दाेघेही रा. टाकळघाट, ता. हिंगणा अशी आराेपींची नावे आहेत. नीरज व समीर पार्किंग कंत्राटदाराकडे काम करतात. प्रमाेद सिंह हा बुधवारी दुपारी गुजरातहून बुटीबाेरी एमआयडीसी परिसरात ट्रकमध्ये माल घेऊ आला हाेता. त्याने आधी पार्किंग शुल्क भरला व पावती घेऊन ट्रक एमआयडीसी परिसरात उभा केला. ट्रक रिकामा केला जात असल्याने तो व त्याचा क्लीनर जेवण करायला बसले.
काही वेळात नीरज व समीर त्यांच्याजवळ आले. त्या दाेघांनीही प्रमाेद सिंहला पुन्हा पार्किंग शुल्काची मागणी केली. त्याने देण्यास नकार दिल्याने त्या दाेघांनीही शिवीगाळ करीत प्रमाेद सिंह व त्याच्या क्लीनरला लाथाबुक्क्या तसेच काठ्यांनी मारहाण करायला सुरुवात केली. यात प्रमाेद सिंहचा हात फ्रॅक्चर झाला आहे. याप्रकरणी एमआयडीसी बुटीबाेरी पाेलिसांनी दाेन्ही आराेपींविरुद्ध भादंवि ३२४, २९४, ५०४, ५०६, ३४ अन्वये गुन्हा दाखल केला असून, या घटनेचा तपास पाेलीस उपनिरीक्षक दिनकर दराडे करीत आहेत.
...ट्रकचालकांमध्ये दहशत
यासंदर्भात ट्रान्स्पाेर्टर प्रीतम सिंह यांनी सांगितले की, ट्रकचालकाकडून १५० रुपये पार्किंग शुल्क घेण्यात आले हाेते. त्यानंतरही पुन्हा पार्किंग शुल्क मागण्यात आले. या एमआयडीसीमध्ये पार्किंग शुल्क वसुलीमध्ये मनमानी केली जात आहे. ट्रकचालक व क्लीनरला मारहाण केली जात असल्याने त्यांच्यात दहशत निर्माण झाली आहे. याच दहशतीपाेटी ट्रकचालक घडलेल्या प्रकाराची पाेलीस अथवा कुणाकडेही तक्रार करीत नाहीत. त्यामुळे दहशत निर्माण करणाऱ्यांवर कठाेर पाेलीस कारवाई करावी, अशी मागणीही प्रीतम सिंह यांनी केली आहे.