लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : धार्मिक कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी निघालेल्या जैन भाविकांच्या प्रवासी बसला ट्रक चालकाने निष्काळजीपणे ट्रक चालवून जोरदार धडक मारली. यामुळे बसमधील एक महिला भाविक ठार झाली तर, १३ प्रवासी भाविक जखमी झाले. त्यातील सात जणांना गंभीर दुखापत झाली आहे. लकडगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीत शुक्रवारी सकाळी ६ च्या सुमारास हा भीषण अपघात घडला. पोलिसांनी दोषी ट्रकचालक दिलीप चौधरी (रा. कारंजा घाडगे) याला अटक केली आहे.आलोक मुनी महाराज यांच्या चातुर्मास प्रवेश शोभायात्रेत सहभागी होण्यासाठी स्थानिक जैन बांधव खासगी प्रवासी बसने वणीकडे निघाले होते. वर्धमाननगरातून (सेंट्रल एव्हेन्यू) टेलिफोन एक्स्चेंज चौकात बस आली असता अतिशय वेगात आलेल्या ट्रक ( एमएच ३१/ एपी ४८८६) ने बसला जोरदार धडक दिली. ही धडक एवढी जोरदार होती की स्फोटासारखा मोठा आवाज झाला. बसमधील सर्वच्या सर्व प्रवाश्यांना दुखापत झाली. त्यातील १३ प्रवासी भाविक जबर जखमी झाले. भल्या सकाळी मोठा आवाज झाल्यामुळे परिसरातील मंडळी मोठ्या संख्येत तिकडे धावली. त्यांनी जखमींना मदतीचा हात देऊन बसबाहेर काढले. कमी प्रमाणात दुखापत झालेल्यांनी लगेच आपल्या नातेवाईक आणि मित्रमंडळींना फोन करून अपघाताची माहिती दिली. नियंत्रण कक्षाच्या माध्यमातून लकडगंज पोलिसांनाही अपघाताचे वृत्त कळले. त्यामुळे पोलिसांसह अनेक जैन बांधव मदतीसाठी तिकडे धावले. त्यांनी जखमींना खासगी इस्पितळात दाखल केले. लकडगंज पोलिसांनी आरोपी ट्रकचालक दिलीप चौधरी याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक केली.
नागपुरात ट्रकची बसला जोरदार धडक; एका महिला भाविकाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2019 2:28 PM
धार्मिक कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी निघालेल्या जैन भाविकांच्या प्रवासी बसला नागपुरात ट्रक चालकाने निष्काळजीपणे ट्रक चालवून जोरदार धडक मारली. यामुळे बसमधील एक महिला भाविक ठार झाली तर, १३ प्रवासी भाविक जखमी झाले.
ठळक मुद्दे१३ जैन भाविक जखमीलकडगंज परिसरात अपघात