लाेकमत न्यूज नेटवर्क
नांद : डाेळ्याच्या शस्त्रक्रियेसाठी रुग्णांना घेऊन जात असलेल्या ट्रॅव्हल्सला विरुद्ध दिशेने येणाऱ्या भरधाव ट्रकने जाेरात धडक दिली. त्यात ट्रॅव्हल्समधील ३२ रुग्णांपैकी १२ जण जखमी झाले. ही घटना भिवापूर पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील नांद-हिंगणघाट मार्गावरील नांद (ता. भिवापूर) नजीकच्या पांजरेपार शिवारातील वळणावर शुक्रवारी (दि. ५) दुपारी २.३० वाजताच्या सुमारास घडली. हे सर्व रुग्ण आरमाेरी (जिल्हा गडचिराेली) तालुक्यातील रहिवासी असून, ६० ते ८२ वर्षे वयाेगटातील आहेत.
जखमींमध्ये लक्ष्मण कावळे, गोपिका खेडकर, अण्णाजी ठाकरे, शारदा ठाकरे, सुनीता ठाकरे, सुनंदा कन्नाके, पुरुषोत्तम गजपुरे, यशवंता इंदूरकर, मीरा जनबंधू, जनाबाई तोरे, शकुंतला नेरकर यांच्यासह अन्य दाेघांचा समावेश आहे. या सर्वांसह एकूण ३२ रुग्णांवर डाेळ्याची शस्त्रक्रिया करावयाची असल्याने, त्यांना घेऊन एमएच-३२/क्यू-३७१० क्रमांकाची ट्रॅव्हल्स आरमाेरीहून भिवापूरमार्गे सावंगी (मेघे) (जिल्हा वर्धा) येथील आचार्य विनाेबा भावे हाॅस्पिटलमध्ये जात हाेती. दरम्यान, पांजरेपार शिवारातील वळणावर विरुद्ध दिशेने वेगात येणाऱ्या एमएच-३१/क्यू-६७४६ क्रमांकाच्या ट्रकने त्या ट्रॅव्हल्सला जाेरात धडक दिली. हा ट्रक मिरची आणण्यासाठी भिवापूरला जात हाेता.
या ट्रॅव्हल्समधील १३ जण जखमी झाले. माहिती मिळताच पाेलिसांनी घटनास्थळ गाठून जखमींना तातडीने नांद येथील प्राथमिक आराेग्य केंद्रात आणले. प्रथमाेपचार केल्यानंतर त्या सर्वांना आचार्य विनाेबा भावे हाॅस्पिटलच्या वाहनाने सावंगी (मेघे) येथे नेण्यात आले. याप्रकरणी भिवापूर पाेलिसांनी गुन्हा नाेंदवून ट्रकचालक सागर उमाशंकर तिवारी (३२, रा. वर्धा) यास ताब्यात घेतले, अशी माहिती ठाणेदार महेश भाेरटेकर यांनी दिली. या घटनेचा तपास पाेलीस उपनिरीक्षक प्रकाश आलम, उमेश झिंगरे, नागेश वाघाडे करीत आहेत.
....
धाेकादायक वळण
नांद-हिंगणघट मार्गावरील पांजरेपार शिवारातील वळण धाेकादायक बनले आहे. याच वळणावर २२ जानेवारी २०२१ राेजी दाेन माेटरसायकलींच्या धडकेत एकाचा मृत्यू तर तिघे गंभीर जखमी झाले हाेते. या वळणावर राेडच्या दाेन्ही बाजूला माेठ्या प्रमाणात झुडपे वाढली आहेत. त्यामुळे समाेरून येणारी वाहने सहसा दिसत नाही. ही झुडपे ताेडण्याची तसदीही सार्वजनिक बांधकाम विभाग घेत नाही.
...
रुग्णवाहिकेचा अभाव
नांद प्राथमिक आराेग्य केंद्र नागपूर जिल्ह्याच्या सीमावर्ती व दुर्गम भागात आहे. या आराेग्य केंद्रात राष्ट्रीय ग्रामीण आराेग्य अभियानांतर्गत (एनआरएचएम) रुग्णवाहिका देण्यात आली हाेती. ती रुग्णवाहिका दाेन महिन्यापासून आराेग्य केंद्राच्या सेवेत नाही. ती नेमकी कुठे नेण्यात आली, हे कळायला मार्ग नाही. या आराेग्य केंद्राला माता-बाल संगाेपन केंद्राची साधी रुग्णवाहिका असून, ती गंभीर रुग्ण व जखमींच्या कामी येत नाही.