लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोल्हापूर आणि सांगली येथील अभूतपूर्व अशा नैसर्गिक संकटात सापडलेल्या नागरिकांसाठी नागपूर उपसंचालक आरोग्य कार्यालयही धावून गेले आहे. या भागातील पुराचे पाणी ओसरत असल्याने जलजन्य व कीटकजन्य आजाराचा धोका निर्माण झाला आहे. तो टाळण्यासाठी या आजाराशी संबंधित औषधांचा एक ट्रक शनिवारी रवाना करण्यात आला.कोल्हापूर, सांगली जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले आहे. सध्या पावसाने घेतलेली विश्रांती आणि अलमट्टी धरणातून वाढवलेला विसर्ग यामुळे दोन्ही जिल्ह्यातील पुराचे पाणी ओसरण्यास सुरुवात झाली आहे. पूरग्रस्त भागातील मदतकार्याला वेग आला आहे. लष्कर, एनडीआरएफ, एसडीआरएफ, नौदल, जिल्हा प्रशासन, लोकप्रतिनिधी, सेवाभावी संस्था, सामाजिक कार्यकर्ते, वैद्यकीय पथके आणि स्थानिक नागरिक यांच्या मदतीने हे मदतकार्य सुरू आहे. शासनाच्यावतीने तसेच स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने दोन्ही शहरांत वैद्यकीय उपचारांची शिबिरे सुरू करण्यात आली आहेत. पुरानंतर या शहरांत साथीच्या आजारांनी डोके वर काढले आहे. दवाखाने, रुग्णालयेदेखील पाण्यात असल्याने या मदतीलाही मर्यादा पडत आहेत. अनेक आजारी व्यक्तींना वैद्यकीय मदत मिळण्यातही अडचण येत आहे. याची दखल घेत पुणे महानगरपालिकेच्यावतीने पूरग्रस्त भागात वैद्यकीय तपासणी सुरु केली आहे. पूरग्रस्तांना तात्काळ औषधोपचार देण्यासाठी आपत्कालीन सुविधा कक्ष २४ तास सुरु ठेवण्यात आला आहे.पूरग्रस्तांना तातडीने वैद्यकीय मदत मिळावी यासाठी सांगली येथून आठ डॉक्टरांचे पथक रवाना करण्यात आले. या अनुषंगाने औषधांची कमतरता भासू नये, यासाठी नागपूर उपसंचालक आरोग्य विभागाने पुढाकार घेत उपसंचालक डॉ. संजय जयस्वाल यांच्या मार्गदर्शनात शनिवारी एक ट्रक औषधे रवाना केली. जलजन्य व कीटकजन्य आजारांवरील हे औषधे असल्याचे डॉ. जयस्वाल यांनी सांगितले. शिपाई राजू काळकर व चालक प्रमोद उमाळे यांनी हा ट्रक घेऊन गेले आहेत.
डॉक्टरांची चमू पाठविण्याचा सूचना नाहीतपूरग्रस्तांना औषधांची कमतरता भासू नये म्हणून शनिवारी एक ट्रक आवश्यक औषधांचा ट्रक रवाना करण्यात आला आहे. यात जलजन्य व कीटकजन्य आजारावरील औषधांचा समावेश आहे. अॅण्टीबायोटिक्स औषधांची संख्या मोठी आहे. तूर्तास तरी वैद्यकीय मदतीसाठी डॉक्टरांची चमू पाठविण्याच्या सूचना नाहीत.-डॉ. संजय जयस्वाल, उपसंचालक, आरोग्य विभाग, नागपूर