लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : लोखंडाने भरलेला ट्रक पोलीस ठाण्यातून चोरी झाल्यानंतर ड्युटीवर तैनात कर्मचाऱ्याने लगेच अधिकारी-कर्मचाऱ्यांशी संपर्क साधला होता. खूप प्रयत्न केल्यानंतरही जबाबदार अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांनी कुठलाही प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे आरोपी संजय ढोणे सहजपणे ट्रक घेऊन शहराच्या बाहेर निघाला. या घटनेमुळे पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. घटनेच्या वेळी लकडगंज पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकारी कर्मचारी झोपले होते का,असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला असून वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ही बाब गंभीरतेने घेत पोलिसांच्या भूमिकेची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.
कुख्यात संजय ढाेणे लकडगंज ठाण्यातून २० टन लोखंडाने भरलेला ट्रक घेऊन फरार झाला होता. दोन दिवसानंतर त्याला पोलिसांनी ट्रकसह पकडले. मिळालेल्या माहितीनुसार पहाटेची वेळ असल्याने नाईट ड्युटीवरील बहुतांश कर्मचारी झोपले होते. यावेळी नेहमीच पोलिसांकडून असाच प्रतिसाद मिळत असतो. संजय हा २५ वर्षांपासून ट्रक चोरीच्या धंद्यात आहे. एकटाच ट्रक चोरी करतो. महाराष्ट्रासह अनेक राज्यात त्याने ट्रक चोरी केले आहे. चोरीचा माल खरेदी करणारे अनेक कबाडी व व्यापाऱ्यांशी त्याचे संबंध आहेत. त्यांच्या माध्यमातून तो सामान विकतो. जामिनावर सुटून आल्यावर त्याने खरेदीदार शोधून ठेवले होते. परंतु या घटनेची माहिती शेजारी राज्यांपर्यंत पोहोचल्याने कुणीही माल खरेदी करण्यास तयार झाले नाही. त्यामुळे संजय ट्रक व लोखंडासह पोलिसांच्या हाती लागला.
तो फेटरीत सापडल्याचे सांगितले जाते संजय मूळचा फेटरीचाच राहणारा आहे. तिथे त्याचे पशु आहाराचे दुकान आहे.