कळमेश्वर : ट्रकच्या मागच्या भागातून टायर, ट्यूब व प्लॅन चाेरून नेले. या साहित्याची एकूण किंमत ७५ हजार रुपये आहे. ही घटना कळमेश्वर पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील नागपूर-अमरावती राष्ट्रीय महामार्गावरील १४ मैल परिसरात नुकतीच घडली.
१४ मैल परिसरात एस. व्ही. ग्लाेबल लाॅजिस्टिक कंपनीचे गाेदाम आहे. त्या गाेदामात टीएन-३२/एजे-३३१० क्रमांकाच्या ट्रकमध्ये चेन्नई (तामिळनाडू) येथून टायर, ट्यूब व प्लॅन आणले जात हाेते. दरम्यान, चाेरट्याने त्या ट्रकच्या मागच्या भागाला असलेल्या दाराचे सील ताेडून आतील सात टायर, ट्यूब व प्लॅन चाेरून नेले. ही बाब लक्षात येताच ट्रकचालक दुराईसिंग मारीमुथू (२६, रा. चेन्नई, तामिळनाडू) याने पाेलिसात तक्रार दाखल केली. या चाेरीला गेलेल्या साहित्याची एकूण किंमत ७५ हजार रुपये असल्याचे त्याने पाेलिसांना सांगितले. याप्रकरणी कळमेश्वर पाेलिसांनी भादंवि ३७९ अन्वये गुन्हा दाखल करून चाेरट्याचा शाेध सुरू केला आहे. या घटनेचा तपास सहायक पाेलीस निरीक्षक खडसे करीत आहेत.