नागपूर : नागपुरातील ट्रक वाहतूकदार पूर्ण भाडे घेतल्याशिवाय ट्रकमध्ये माल भरणार नाहीत. जर कोणतेही गोडाऊन, कारखाना, व्यापारी वा वाहतूकदाराने डिस्काऊंट वा हमाली तसेच विविध कारणांनी अवैध वसुली करण्याचा प्रयत्न केल्यास त्यांच्याविरुद्ध सर्व ट्रकमाल व ट्रक पुरवठादार कायदेशीर कारवाई करतील आणि संबंधित व्यापारी व वाहतूकदारावर पूर्णपणे बहिष्कार टाकण्याचा निर्णय नागपूर ट्रकर्स युनिटीने घेतला आहे.
‘ज्याचा माल, त्याचाच हमाल आणि पूर्ण भाडे’ या मोहिमेंतर्गत बुधवारी नागपूर ट्रकर्स युनिटीचे अध्यक्ष कुक्कू मारवाह यांच्या अध्यक्षतेखाली गुजर लॉन, टेका नाका येथे विविध वाहतूकदार संघटनांचे पदाधिकारी आणि वाहतूकदारांची बैठक पार पडली. डिझेल दरवाढीने संकटात आलेल्या ट्रक वाहतूकदारांच्या समस्यांवर तोडगा काढण्याचा प्रयत्न करण्यात आला. या अंतर्गत सर्वसंमतीने उपरोक्त निर्णय घेण्यात आला.
बैठकीत बीटीटीडब्ल्यूए महाराष्ट्रचे प्रभारी राकेश अग्रवाल, बीआरपीएसचे नरेंद्र मिश्रा, निशान सिंह घोत्रा, मलकीत सिंह बल, गुल्लू सरपंच, जर्नेल सिंह, नायाब खान, नीलेश पोंडा, रितेश जयस्वाल, महेंद्र जैन, बबलूभाई, गुरबीर सिंह, सईदभाई, चतर सिंह, सुखविंदर सिंह, पलविंदर सिंह, शाहीदभाई, सुरेंद्र मोहन सिंह यांच्यासह शेकडो ट्रक वाहतूकदार उपस्थित होते.