लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पंडित नेहरू यांच्या हाती देश आला तेव्हा देशाची अवस्था अतिशय बिकट होती. दर तीन वर्षाने दुष्काळ पडत होता. लाखो नागरिक दृष्काळात मृत्युमुखी पडत होते. शेती धड होत नव्हती, साधी टाचणीसुद्धा या देशात बनत नव्हती. अशा दुष्काळग्रस्त भारताला कृषी, उद्योग, रोजगार, अणुऊर्जा, क्षेपणास्त्र अशा सर्वच आघाड्यांवर पुढे नेणारे पंडित जवाहरलाल नेहरू भारताचे खरे भाग्यविधाता आहेत. त्यांच्या प्रयत्नाने पहिल्याच पंचवार्षिक योजनेत देशाचा उत्पन्नाचा दर १८ टक्क्यांवर पोहचला होता. आज हा दर ६ टक्क्याच्या घरात असतानाही चांगला मानला जातो आहे, अशा शब्दात राजकीय विचारवंत व लोकमतचे संपादक सुरेश द्वादशीवार यांनी पंडित नेहरूंवर टीका करणाऱ्यांना सडेतोड उत्तर दिले.यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान विभागीय केंद्र नागपूरतर्फे पंतप्रधान जवाहरलाल नेहरू या विषयावर सुरेश द्वादशीवर यांच्या व्याख्यानाचे आयोजन शनिवारी श्रीमंत बाबुराव धनवटे सभागृहात करण्यात आले होते. व्याख्यानाला अध्यक्ष म्हणून प्रतिष्ठानेचे अध्यक्ष डॉ. गिरीश गांधी उपस्थित होते. यावेळ द्वादशीवार यांनी नेहरुंनी पंतप्रधानांची सूत्र स्वीकारल्यानंतर त्यांच्यापुढे उभी ठाकलेली आव्हाने आणि त्यातून साधलेली देशाची प्रगती यावर विस्तृत भाष्य केले. नेहरूंना पंतप्रधान करून सरदार पटेलांना डावलल्याचे बोलले जाते. हा गैरसमज दूर करताना द्वादशीवार म्हणाले की, देश स्वतंत्र झाल्यानंतर सरदार पटेल हे ७२ वर्षाचे होते, शिवाय ते आजाराने ग्रस्त होते. त्यावेळी पंडित नेहरू हे केवळ ५८ वर्षाचे होते आणि सर्वांचे आवडते होते. काँग्रेसच्या वर्किंग कमिटीत सरदार पटेलांनी नेहरूंना पंतप्रधानपद देण्याची भूमिका मांडली होती. पटेलांनी कधी अन्याय झाला असे म्हटले नाही. पण पंतप्रधान मोदींनी पटेलांचे वकीलपत्र घेऊन त्याचे परिमार्जन करण्यासाठी पटेलांचे भव्य स्मारक उभारत आहे आणि त्यांचा पुतळा चीनमध्ये तयार केला जात आहे.दुष्काळ, दारिद्र्यात खितपत पडलेला हा देश नेहरूं च्या वाट्याला आला. भीक मागून त्यांनी हा देश उभा केला. तो जगविला आणि पहिल्या पंचवार्षिक योजनेच्या पूर्णत्वानंतर प्रगतीच्या वाटा सुकर केल्या. देशाच्या सर्वोच्च शिखरावर जाऊन बसलेल्या नेहरूंना पक्षांतर्गतसुद्धा मोठे आव्हान होते. सरदार पटेल, डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी वेगवेगळ्या मुद्यांवर त्यांची अडवणूक केली.आपली बाजू मांडताना त्यांनी पंतप्रधान पदसुद्धा त्यागण्याची भूमिका मांडली होती. त्याच काळात संपूर्ण देशभरात वेगवेगळ्या चळवळी सुरू झाल्या होत्या. या सर्व चळवळींवर त्यांनी यशस्वी मात करून देशात लोकशाही रुजविली, संसदीय कार्यप्रणालीचा अंगीकार केला.त्यांचे अलिप्ततेचे धोरण ठरले प्रभावीदेशाची फाळणी सुरू असतानाच पाकिस्तानचे आक्रमण झाले. त्यावेळी पाकिस्तान व भारताची सेना सारखी होती. पण भारतात इतर चळवळी आक्रमक असल्याने सेना विखुरलेली होती. त्यामुळे काही अप्रिय निर्णय घ्यावे लागले, पण तो नेहरूंचा दुबळेपणा नव्हता. त्यावेळी असलेली लष्कराची शक्ती आणि बळ हेच प्रमुख कारण होते. फाळणीनंतर पाकिस्तान अमेरिकेच्या गोटात सामील झाला होता. महासत्ता असलेला रशिया भारताला प्रतिसाद देत नव्हता. त्यामुळे पंडित नेहरूंनी अलिप्ततेचे धोरण स्वीकारले. पुढे त्यांच्या धोरणाला १४० देशांनी पाठिंबा दिला. ते जगाचे नेते झाले. त्यामुळेच डॉ. राजेंद्रप्रसाद यांनी नेहरूंना भारतरत्न बहाल केले असल्याचे द्वादशीवर म्हणाले.