गोपालकृष्ण मांडवकरलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोरोनाच्या धास्तीने सारेच बंदिस्त झाले आहेत. बंदिस्त व्हा, असे सर्वांनाच सांगितले जात आहे. एकमेकांचा संपर्क टाळून अधिकाधिक स्वच्छ राहण्याच्या सूचना सर्वांना मिळताहेत, अवघ्या जगासोबत नागपूरकरही याचे पालन करीत आहेत. तरीही जिवावर उदार होऊन एक घटक राबतो आहे, रस्त्यावरच्या घाणीत.., कचऱ्यात.., गल्लीबोळात ! होय, तोच तो ‘सफाई कामगार’!घरात बसून स्वच्छतेची काळजी करणाऱ्यांजवळ सॅनिटायझर आहे. मास्क आहेत. दिवसातून पंधरा वेळा हात ध्ुाण्यासाठी नळ आहेत. मात्र लोकांच्या स्वच्छतेची काळजी वाहणारे सफाई कामगार तोंडावर मास्क चढवून आणि हातात ग्लोव्ह्ज घालून गल्लीबोळातील कचरा स्वच्छ करीत आहेत. रस्त्यावर फेकलेले मास्क, पाऊच, पालापाचोळा आणि रस्त्यावरून धावणाºया अगणित माणसांच्या पायाला चिकटलेले कचºयातील जीवजंतूही ते उचलत आहेत. आम्ही घरात बसून चकचकीत आंघोळ करतो, साबण वापरून भांडी घासतो. घरातील वापराचे पाणी पाईपमधून नालीत सोडतो. या तुंबलेल्या नाल्या कोरोनाच्या जीवघेण्या वातावरणातही ते साफ करत आहेत.नागपूर शहरात स्थायी आणि अस्थायी स्वरूपाचे ६ हजार ५०० सफाई कामगार आहेत. लक्ष्मीनगर, धरमपेठ, धंतोली, सतरंजीपुरा, हनुमाननगर, नेहरूनगर, गांधीबाग, आशीनगर, मंगळवारी, लकडगंज आणि सतरंजीपुरा या १० झोनमध्ये हे कामगार राबतात. ४० लाख लोकसंख्येच्या या शहरात दररोज १ हजार १५० मेट्रिक टन कचरा निघतो. घरात आणि मार्केटमध्ये कचरा करणाºया आम्हा ‘सुजाण’ माणसांच्या सेवेसाठी सकाळी कचरा संकलन करणाºया गाड्या फिरतात. कोरोनाच्या दहशतीतही त्यांचे काम थांबलेले नाही. आम्ही कचरा करायचा, नाल्या तुंबवायच्या आणि त्यांनी सफाई करत शहरात राबायचे!होय, तीसुद्धा आहेत माणसेच? त्यांच्याही घरात सायंकाळी वाट पाहणारे वृद्ध आईवडील, पत्नी, पती असतोच. डोळ्यांच्या कोपºयात प्राण एकवटून सायंकाळी कामावरून परतणाºया बाबाची वाट पाहणारी लेकही त्याच्या घरात असेलच की! त्याच्या आरोग्य-अनारोग्यासोबत त्याचे कुटुंबही जुळले आहे. विषाणूचा धोका त्यालाही माहीत आहे; तरीही तो लढतोय विषाणूंसोबत; अढळ योद्ध्यासारखा!‘त्यांना’ आम्ही काय देतो ?अनारोग्याच्या रणांगणावर प्राणपणाने लढून समाजाचे रक्षण करणाºया या सैनिकाला आम्ही काय देतो? कधी बोलतो आपण मोकळेपणे त्यांच्याशी? उच्चभ्रूपणाची झूल पांघरणारे आम्ही त्यांचा कधी विचारही करीत नाही. त्यांच्याशी आम्ही कधी प्रेमाने बोलत नाही. घरासमोरची नाली साफ करणाºयांना कधी चहासाठीही विचारत नाही, प्रकृतीची चौकशी करणे तर दूरच राहिले! कारण ते प्रतिष्ठित नाहीत. हा समाज तुसडेपणाने वागूनही ते मात्र निष्ठेने सेवा करतात. कधी कुरकूर नाही, तक्रार नाही. एवढेच नाही, तर समाजाकडून त्यांच्या कसल्याही अपेक्षा नाहीत. तरीही आम्ही त्यांना उपेक्षित ठेवतो. कारण आमच्या मनावर चढलेली पुटं आणि अंगावरच्या झुली!...आता तरी ओळखा देव !कोरोनाचे जंतू लागण करताना भेदभाव करीत नाही. लहान-मोठा बघत नाहीत. त्यामुळे हे सफाई कामगार उद्या स्वत:चे आरोग्य जपण्यासाठी घरात बसले तर आमचे घराबाहेर पडणे कठीण होईल. गल्लीबोळात कचरा तुंबेल, कोरोना सर्वांच्याच दारावर टकटक करेल. आज देवळं बंद झालीत. पण या सफाई कामगारांच्या रूपाने गाभाºयातला देव गल्लीबोळात झाडू घेऊन फिरतोयं, तुंबलेली मोरी उपसतोयं, कचरा संकलन वाहनावर राबूून आम्ही केलेला कचरा उचलतोय. आता समाजाला त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलावा लागेल. सेवकांच्या रूपाने राबणारे हेच खरे देव आहेत, हे समाजाला ओळखावे लागेल. त्यांच्याशी प्रेमाने बोलून भावना समजून घ्याव्या लागतील. त्यांच्याही आरोग्याची काळजी आपणाला वाहावी लागेल. अन्यथा हा देव रुसला तर काही खरे नाही, हे आता तरी समजून घ्या!