लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सुखासीन आयुष्यापेक्षा सामान्यपणे जगलेल्या आयुष्यातच खरे सुख असते. गौतम बुद्धांनीही सुखाचा हाच मार्ग सांगितला. त्यामुळे याच मार्गाचे अनुसरण करा, असे आवाहन थायलंड येथील निर्वाना पीस फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ. पोनसोंग यांनी केले.डॉ. पोनसोंग यांनी जगातील नागरिकांना ८४ हजार बुद्धमूर्ती दान करण्याचा संकल्प केला आहे. सहाव्या टप्प्यात नागपुरात मंगळवारी १५१ बुद्धमूर्तींचे दान करण्यात आले. या समारंभाचे औचित्य साधून वर्ल्ड पीस इथिक्स स्पर्धेत प्राविण्य मिळविलेल्या अन्वी मून, मुस्कान सिंग आणि अक्षदा गजभिये या तीन विद्यार्थिनींना गोल्डन इथिक्स पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. बहुउद्देशीय शिक्षण संस्थेच्या वतीने हा समारंभ आयोजित करण्यात आला होता. अध्यक्षस्थानी बानाईचे अध्यक्ष पी.एस. खोब्रागडे होते. आंतरराष्ट्रीया चित्रपट अभिनेते गगन मलिक मुख्य पाहुणे होते. महालक्ष्मी एज्युकेशन सोसायटीचे सुरेश गायकवाड, समता सैनिक दलाचे बोधानंद गुरुजी, बानाईचे सचिव महेंद्र राऊत, उपाध्यक्ष जयंत इंगळे, अहिल्यादेवी होळकर बहुउद्देशीय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष नितीन गजभिये यांच्यासह भिक्कू संघ उपस्थित होते.८४ हजार बुद्धमूर्ती दान करण्याच्या संकल्पनेबद्दल डॉ. पोनसोंग म्हणाले, थायलंडमध्ये ४० हजार बुद्धमंदिरे आहेत. या प्रत्येक मंदिराने दोन मूर्ती दिल्या तरी हे उद्दिष्ट पूर्ण होणार होते. तशी संकल्पना तेथील मंदिरांकडे आपण मांडली. आश्चर्य म्हणजे एका मंदिरातूनच १७०० बुद्धमूर्ती मिळाल्या. अनेक जण या कार्यासाठी पुढे आले. त्यामुळे हे उद्दिष्ट साध्य होऊ शकले. या मूर्तिदानाच्या माध्यमातून बुद्धांचा शांतीचा संदेश जगात पसरावा, हा आपला हेतू आहे.गगन मलिक म्हणाले, सर्व धर्मांना आणि माणसांना जोडण्याचा शांतीचा मार्ग बुद्ध तत्त्वज्ञानातूनच जातो. आम्ही बुद्धाला सारेच शरण जातो. मात्र ‘संघम् शरणम्’ हे विसरलो. एकसंघपणे एकमेकांना सहकार्य करून काम करण्याची गरज विसरल्याने बुद्धीझमचा प्रसार जगात कमी आहे. धम्मपालनासोबत उत्तम आचरणाचेही त्यांनी आवाहन केले. पी.एस. खोब्रागडे यांनीही यावेळी समयोचित मार्गदर्शन केले.कार्यक्रमादरम्यान वर्ल्ड पीस इथिक्स स्पर्धेत प्राविण्य तसेच या परीक्षेसाठी सहकार्य करणाऱ्या शिक्षकांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. विदर्भभरातून आलेल्या नागरिकांना बुद्धमूर्तींचे वितरण करण्यात आले. चीनमध्ये कोरोना व्हायरसमुळे मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांना कार्यक्रमादरम्यान श्रद्धांजली वाहण्यात आली. संचालन भीमराव खोसे यांनी केले तर आभार नितीन गजभिये यांनी मानले.
सामान्य आयुष्यातच खरे सुख : पोनसोंग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2020 10:23 PM
सुखासीन आयुष्यापेक्षा सामान्यपणे जगलेल्या आयुष्यातच खरे सुख असते. गौतम बुद्धांनीही सुखाचा हाच मार्ग सांगितला. त्यामुळे याच मार्गाचे अनुसरण करा, असे आवाहन थायलंड येथील निर्वाना पीस फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ. पोनसोंग यांनी केले.
ठळक मुद्देबुद्धमूर्ती दान समारंभ : अहिल्याबाई होळकर शिक्षण संस्थेचे आयोजन