हिंगणा : कोरोना महामारीच्या नियंत्रणासाठी लसीकरण हाच प्रभावी उपाय आहे. तालुका प्रशासनाने लसीकरण वाढविण्यासाठी जनजागृती करावी, यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करावेत, अशा सूचना हिंगणा तालुक्यातील लोकप्रतिनिधींच्या वतीने देण्यात आल्या. हिंगणा तहसील कार्यालयात शुक्रवारी तालुक्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यात आला. या बैठकीला खा. कृपाल तुमाने, जिल्हा परिषद सदस्य दिनेश बंग, तहसीलदार संतोष खांडरे, तालुका आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधीक्षक, हिंगण्याचे ठाणेदार सारिन दुर्गे, बीडीओ महेंद्र जुवारे आदी उपस्थित होते.
तालुक्यात सर्व रुग्णांना उपचार मिळावेत याची जबाबदारी तालुका प्रशासन व तालुका आरोग्य विभागाने करावी. दवाखान्यात दाखल होणाऱ्या प्रत्येक रुग्णाला कोरोना अँटिजेन टेस्ट अनिवार्य करावी. त्यामुळे संबंधित रुग्णाच्या आजाराचे योग्य निदान होईल. लसीकरण वाढविण्यासाठी स्थानिक पातळीवरील राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांची मदत घ्यावी, अशा सूचनाही या बैठकीत लोकप्रतिनिधींनी केल्या.