नागपूर: आज गुरूनानकजयंतीनिमित्त जगभरातील गुरुद्वारांमध्ये कडाप्रसाद शिजवला जाईल. भक्तगण मोठ्या आदराने त्याचे ग्रहण करतील. कडाप्रसाद म्हणजे कणकेच्या पीठाचा अतिशय मधुर असा शिरा. तसं पाहिलं तर शिरा हा देशाच्या विभिन्न प्रांतात विविध पद्धतीने बनवला जातो. हा कडा प्रसाद घरीच कसा बनवायचा हे आपण आता पाहू. बनवायला अतिशय सोपा असलेल्या या पदार्थाचे एकच सूत्र लक्षात ठेवायचे. ते म्हणजे १:१:१:२ असे प्रमाण.साहित्य- एक वाटी गव्हाची कणीक, एक वाटी साखर, एक वाटी तूप, दोन वाट्या पाणी.कृती- दोन वाट्या पाणी पातेल्यात घालून ते गरम झाले की त्यात एक वाटी साखर घालून चांगले ढवळावे. साखर विरघळली की खाली उतरवून ठेवावे. ते आटू देऊ नये.दुसऱ्या कढईत एक वाटी तूप गरम करून त्यात एक वाटी कणीक घालावी. ही कणीक मंद आचेवर शिजवावी. सतत हलवत रहावे लागते. ते सोडून दुसरे कुठलेही काम करू नये. कारण कणिक फार चटकन खाली लागण्याची शक्यता असते. हळूहळू कणकेचा रंग बदलत जातो. तो क्रमश: हलका तपकिरी, मध्यम हलका तपकिरी आणि सरतेशेवटी गडद तपकिरी होतो. कणिक शिजली की नाही याची खूण म्हणजे, त्या कणकेला रवाळपण येते. रवाळपण आले की समजायचे पुरेसे भाजले गेले आहे म्हणून. मग त्यात साखरेचे पाणी घालायचे. सतत ढवळत रहायचे. हळूहळू त्याला तूप सुटू लागते. जरा सैलसर घट्टपण आले की आचेवरून खाली उतरवायचे. वरून सुकामेव्याची सजावट करायची. मस्तपैकी कडाप्रसाद तयार..
गुरूनानकजयंतीनिमित्त करून पहा कडाप्रसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2018 10:02 AM